वनविभागाच्या नरमाईच्या धोरणामुळे मंडणगडमधील जंगलतोड तेजीत

अवैध वृक्षतोड व वाहतूक तालुक्यात ठरला आहे चर्चेचा विषय.

मंडणगड : प्रतिनिधी :        शासनाच्या वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला मंडणगड तालुक्यात मात्र घरचा आहेर दिला आहे. मंडणगड तालुक्यात वृक्षतोडीचे विदारक चित्र पुढे येत आहे. शेकडो टन लाकूड मोठ्या महानगरांमध्ये अवैद्यरित्या स्थलांतरित केले जाते. येथे वनविभागाची भूमिका स्पष्ट होत नाही, इतकी वाहतूक होत असताना कोणतीही थेट कारवाई मागील अनेक दिवसात झालेली नाही.

तालुक्याला निसर्गाने भरभरून नैसर्गिक साधनसंपत्ती दिली आहे. शासनदरबारी डोंगरी म्हणून नमूद असलेल्या तालुक्याला मागील काही वर्षांपासून लाकूडतोडीचे मात्र ग्रहण लागले. जंगले, डोंगर वृक्षतोडीने बकाल केली जात आहेत. यावर्षी पाऊस सुरु झाला तरी वृक्षतोड पाहायला मिळतेय, येथील जंगलतोडीचे प्रमाण एवढे वाढले आहे कि, साधे महामार्गावरून प्रवास करताना समोरील दिसणारा डोंगर रुक्षतोडीने बकाल झाल्याचे प्रवाश्यांच्या सहज निदर्शनात येते, इतके वनविभागाचे पारदर्शक काम तालुक्यात सद्या सुरु आहे. शेकडो टन लाकूड रात्रीच्या अंधारात मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरात तर गुजरात सारख्या परराज्यातही वाहतूकीने निर्यात केले जाते, यातील बहुतांशी वाहतूक ही विनापरवाना अवैद्यरित्या केली जाते.

तालुक्याचे वनक्षेत्र कमी असल्याचा निर्वाळा तालुक्याचे वनपाल, वनाधिकारी हे स्वतः विविध आयोजित पर्यावरणपूरक कार्यक्रमामध्ये देत असतात, मात्र वृक्षतोडीला लगाम घालण्याचे कर्तव्य साधताना दिसत नाहीत. वनविभागाचे ठिकठिकाणी आवश्यक असलेले चेकनाके उपलब्ध नसल्याने अवैद्य वाहतुकीचे प्रमाण अधिक वाढले आहे, अवैद्य वृक्षतोड आणि त्यांची अवैध वाहतूकीची बाब सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार वनविभागाच्या निदर्शनात आणून दिली मात्र वनविभागाच्या उदासीन कारभाराच्या पवित्र्यामुळे मात्र या गंभीर प्रकारास कायम दुजोरा मिळत राहिला, असे तालुकवासियांमधून वन विभागाच्या विरोधात आता जाहीर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

वनविभागाने अवैद्य वृक्षतोड आणि वाहतूक याविरोधात कठोर कारवाईचा बडगा उभारण्याची गरज आहे. सर्वच नियम धाब्यावर बसुवून केलेली येथील अवैध वृक्षतोडीमुळे येथील जैवविविधता नष्ट होण्याचा धोका संभवतो, वनांचे रक्षण न केल्यामुळे वातावरातील बदलाबरोबरच जंगली श्वापदे मानवी वस्तीत येणाच्या घटना वाढल्या आहेत, तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यांची शिकार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, निसर्गाला आव्हान देण्याच्या या मानवी कृत्याला आता कुठेतरी थांबवण्याचे गरजेचे आहे.