मालवण मध्ये आढळला दुर्मिळ ‘मास्क बुबी’ समुद्री पक्षी

मालवण | प्रतिनिधी : मालवण दांडी समुद्र किनारी दुर्मिळ “मास्क बुबी” हा समुद्री पक्षी स्थानिकांना दिसून आला. उडण्याच्या स्थितीत नसलेल्या या पक्षाला युथ बीट्स फाॅर क्लायमेट या संस्थेचा सदस्यांनी एक रात्र सांभाळून उडण्याच्या स्थितीत आल्यावर पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले.

रवीवारी समुद्रालाही उधाण होते. सोसाट्याच्या वारा सुरु होता. संध्याकाळी पावसाने थोडी उसंत घेतली. मालवण दांडी येथील साहिल कुबल आणि त्याचे बाबा चंद्रकांत कुबल रात्री दांडी किना-यावर फेरफटका मारत होते. साहिलला समुद्राच्या लाटेमध्ये एक मोठा पक्षी स्थिर उभा असलेला दिसला. त्याने बाबांना पक्षी दाखवला. ते त्या पक्षाजवळ आले. पक्षी तसाच शांत. आजुबाजुला भटके कुत्रे फिरत होते. साहिलने युथ बीट्स फाॅर क्लायमेट या संस्थेचा सदस्य असलेल्या अक्षयला फोन लावला. अक्षय लगेच तिथे पोचला. पक्षी गायबगळ्यापेक्षा मोठा होता. डोके आणि त्याखालचा भाग राखाडी रंगाचा. पोट पांढरे. पाय मात्र बदकासारखे. अक्षयने लगेच त्यापक्षाचे फोटो युथ बीट्स फाॅर क्लायमेटचे सदस्य दर्शन वेंगुर्लेकर व स्वप्नील यांना पाठवले, तो पक्षी मास्क बुबी असल्याची खात्री झाली. हे पक्षी प्रशांत महासागर परीसरात मोठ्या प्रमाणावर असतात. विणीच्या हंगामात समुद्रातील बेटांवरचे खडक शोधतात. तेथे अंडी घालतात. पिल्ले थोडी मोठी झाली की महासागराच्या दिशेने जातात. हा मास्क बुबी आहे. अक्षयच्या लक्षात आले हे पिल्लू असल्यामुळे त्याला उडायला शक्ती नाही. पिल्लू इथे असेच राहीले तर कुत्रे फाडून खाणार. अक्षयने पक्षाला पकडून अन्य सदस्या स्वाती, मनिषा यांच्याकडे नेऊन पिंजऱ्यात ठेवला. पिंजरा हवेशीर जागेत ठेवला. सकाळी पक्षी ताजातवाना दिसत होता. आपल्या निळसर रंगाची झाक असलेल्या मोठ्या चोचीने अंग स्वच्छ करीत होता. सर्वांची खात्री पटली हा उडू शकेल. कांदळवन असलेली खाडी आणि जवळ समुद्र अशी जागा म्हणजे कोळंब पूलाजवळील जागा. समजा जास्त उडायला समजले नाही तर कांदळवनाच्या फांदीवर बसेल. तिथे तो जास्त सुरक्षित राहील, दर्शनची ही सूचना सर्वांनाच आवडली. अक्षय, साहिल, भार्गव, दर्शन आणि संजय, स्वाती कडे आले. साहिल आणि अक्षयने पिंजरा आणला. दर्शनच्या मोटरसायकलला पिंजरा बांधला. त्याला घेऊन सगळे खापरेश्वर मंदिराच्या पुढे आले. योग्य जागा बघून पिंजरा ठेवला. पक्षी क्षण दोन क्षण घुटमळला. हलकेच उडून समोरच्या पाण्यात पोहू लागला. वेग पकडत त्याने आकाशाला गवसणी घातली. समुद्रावरुन घिरट्या घालू लागला. समुद्री पक्षाला समुद्र मिळाला. तो आनंदात होता. थोडया अंतरावर जाऊन पक्षाने समुद्रात डुबकी मारून मासा पकडला. युथ बीट्स फाॅर क्लायमेट च्या सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले.