खेड(प्रतिनिधी)शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी शहरात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत आहे. नगर प्रशासनाची प्लास्टिक विरोधातील कारवाई थंडावल्याने साऱ्यांचेच फावत असल्याचे दिसत आहे. यामुळे येथे प्लास्टिक बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे.
शहरातील दुकानांसह विशेषतः मिठाईच्या दुकानांमध्ये सर्रासपणे प्लास्टिक पिशव्याचा वापर सुरू आहे. नगर प्रशासनाने काही महिन्यांपूर्वीच प्लास्टिक पिशव्याचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांना दणका देत दंडात्मक कारवाई केली होती. या कारवाईच्या धसक्याने प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. मात्र नगर प्रशासनाची प्लास्टिक विरोधातील कारवाईची मोहीम पुरती थंडावली आहे.
सद्यस्थितीत बाजारपेठेत सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. पावसाळी हंगामाच्या.पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. याच गर्दीचा फायदा घेत काही व्यावसायिक बिनधास्तपणे ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र ही बाब नगर प्रशासनाच्या निदर्शनात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे प्रशासनाकडून स्वच्छतेचा जागर सुरू असताना दुसरीकडे मात्र प्लास्टिकचा सर्रासपणे वापर सुरू असल्याने शासनाचे आदेश नगर प्रशासनाकडूनच धाब्यावर बसवले जात असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर प्रशासनाला प्लास्टिकविरोधात कारवाईसाठी पुन्हा सवड मिळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.











