पुलाला देखील गळती
माखजन l वार्ताहर : गेली दोन वर्षे आरवली येथील उड्डाणपूलाचे काम रखडले आहे.यावर्षी येथील परिस्थिती अजूनच बिकट झाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
जुन्या नावाने मुंबई गोवा व आत्ता नव्याने ओळखल्या जाणाऱ्या पनवेल कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्गावर आरवली येथे गेली दोन वर्षे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.संथ गतीने चाललेल्या कामाचा फटका येथील रहिवासी,व येथून प्रवासासाठी आलेल्या नागरिकांना बसत आहे.
उड्डाणपूलाचे काम पूर्ण होण्याआधीच पुला खालती स्लॅब मधून पाण्याच्या धारा लागल्या आहेत.शिवाय गोव्याकडून पनवेल कडे जाणाऱ्या दिशेने सर्व्हिस रोड चे काम सुरू असल्याने ,याठिकाणी पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सदर रस्त्याचे काम सुरू असल्याने ,या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.यामुळे प्रवाशांना गेले दोन महिने अर्धा किमी दूर गरम पाण्याच्या कुंडपर्यत पायपीट करून,उन्हा पावसात एसटी बस ची वाट पाहत उभे राहावे लागत आहे.उड्डाणपूला सोबतच सर्व्हिस रोडचे काम जलद गतीने होण्याची गरज होती.
सध्या मुंबई,पुणे स्थित जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढू लागली आहे.आरवली येथे आल्यावर मुंबई ला जाणाऱ्या बसेससाठी प्रवाशांना काळोखातून गरंम पाण्याच्या कुंडाजवळ हायवेवर ताटकळत उभे राहावे लागत आहे.याठिकाणी प्रवाशांना अपुरी जागा असल्यामुळे खुद्द महामार्गावर रस्त्यातच उभे राहावे लागत आहे.याठिकाणी अपघात झाला तर जबाबदार कोण असा सवाल सध्याक्स उपस्थित केला जात आहे.
Ni
शिवाय उड्डाणपूलाखाली देखील चिखलाचे साम्राज्य झाले आहे.खड्डेमय असलेला परिसर यामुळे आरवली नाक्यात आल्यावर प्रत्येक जण या बकाल कामावर संताप व्यक्त करत आहे.
नेहमीच येतो मग पावसाळा हे माहीत असून देखील,गेली दोन वर्षे आरवली उड्डाणपूलाच्या कामाची गती का वाढवली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.आरवली येथे चिपळूण कडे जाणारा सर्व्हीसरोड बंद केल्यामुळे चिपळूण कडून गोव्या कडे जाणाऱ्या एकेरी सर्व्हिस रोड वरूनच दोन्ही बाजूला जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे.अरुंद असलेल्या या सर्व्हिस रोड मुळे अपघात नाकारता येत नाही.या सर्व्हिस रोड वरून दोन मोठी वाहने एकाच वेळी पास होत नसल्यामुळे सतत येथे वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.आरवली येथे झालेल्या एकूणच कोंडीला जबाबदार कोण,आणि प्रशासन उदासीन का असा प्रश्न येथील नागरिक व प्रवासी विचारत आहेत.जैसे थे परिस्थिती राहिल्यास भविष्यात गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल अटळ आहेत हे निश्चित.एकीकडे विकासाच्या नावाखाली चाललेली कासव गतीने कामं आणि स्थानिकांसह,प्रवाशांना सहन करावा लागणार त्रास याचा ताळमेळ शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग घालेल का हाच प्रश्न आहे.











