नेमळे गावडेवाडी येथील शेतकऱ्याची विहीर कोसळली

लाखोंचे नुकसान : नुकसान भरपाईची मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : नेमळे गावडेवाडी येथील शेतकरी दत्ताराम (तातो) राघोबा मालवणकर यांच्या मालकीची दगडी बांधकाम केलेली शेतविहीर सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली आहे. यामुळे मालवणकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

दत्ताराम मालवणकर यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी बँकेकडून कर्ज घेऊन ही विहीर बांधली होती. या विहिरीचा उपयोग ते आपल्या माड बागायती, आंबा कलम तसेच शेतीसाठी करत असत. विशेष म्हणजे, उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात आजूबाजूची अनेक कुटुंबे देखील याच विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत असत, ज्यामुळे ही विहीर परिसरातील लोकांसाठी एक महत्त्वाचा जलस्रोत होती.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही शेतविहीर कठड्यासहित पूर्णपणे कोसळून जमीनदोस्त झाली आहे. या घटनेमुळे शेतकरी दत्ताराम मालवणकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शेतकरी मालवणकर यांनी तात्काळ नेमळे ग्रामपंचायतीला कळवले. त्यानंतर नेमळे ग्रामसेवक चौहान, तलाठी पोळ, सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ आणि लिपिक राजा गवस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. मालवणकर यांनी शासनाकडे अतिवृष्टीमुळे कोसळलेली आपली विहीर पुन्हा बांधून मिळावी अशी मागणी केली आहे.