डॉ. दत्तप्रसाद सावंत यांना ‘स्पिसीज ॲण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड – २०२५’; पर्यावरण संवर्धनातील कार्याची दखल

मुंबई | निसर्ग व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन सादर करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. दत्तप्रसाद अविनाश सावंत यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि SFC Environmental Technologies यांच्यातर्फे दिला जाणारा ‘श्रीकर अष्टपुत्रे स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराअंतर्गत ‘स्पिसीज ॲण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड – २०२५’ या श्रेणीमध्ये त्यांची निवड झाली आहे.

हा पुरस्कार सोहळा ५ जून २०२५, गुरुवारी सायंकाळी ६ वाजता, स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पार पडणार आहे.

पर्यावरणीय आणि शास्त्रीय योगदान:
डॉ. सावंत यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १७ शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. त्यांनी ९ नव्या चतुर आणि टाचण्यांच्या प्रजातींचा शोध, त्यापैकी ४ प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शोधल्या आहेत. जिल्ह्याच्या जैवविविधतेचा व्यापक अभ्यास करत १२०+ चतुर-टाचण्या आणि १५०+ फुलपाखरांचे नोंदवहीत समावेश केला आहे.
त्याशिवाय, ते नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बंगळुरू येथे डॉ. कृष्णमेघ कुंटे यांच्यासोबत संशोधन करतात आणि Indian Odonata या सिटीझन सायन्स वेबसाईटचे सह-संपादकही आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील कार्य:
केईएम रुग्णालयातून एम.डी. पदवी घेतलेल्या डॉ. सावंत यांनी कोविड काळात सलग तीन वर्षे सेवा दिली असून, याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून कृतज्ञता पत्र मिळाले आहे.
त्यांनी बी.एम.जे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकात बाल अपघातांवरील संशोधन प्रसिद्ध केले आहे. सध्या ते देवगड येथे ओपीडीच्या माध्यमातून रुग्णसेवा करत असून, त्यांनी केईएम, सायन व जीएमसी सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय अध्यापनही केले आहे.

‘श्रीकर अष्टपुत्रे स्मृती पुरस्कार’ हा पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यावसायिकांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.