संवाद फेक आणि अभिनयाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले l दाजी नाईक :पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं. ४ च्या विद्यार्थिनींनी ‘कृष्ण-हनुमान युद्ध’ आणि ‘रामदर्शन’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. संवाद फेक आणि अभिनयाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या पारंपरिक नाट्यकलेत मुलींच्या उत्स्फूर्त सहभागाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
श्री देवी सातारी मंदिराजवळील धोकमेश्वर येथे सादर केलेल्या ‘कृष्ण-हनुमान युद्ध’ नाटकात कुमारी मृण्मयी परब, चिन्मयी परब, पार्थवी परब, वरदा परब, श्रेया किनळेकर, युक्ता किनळेकर, धनश्री किनळेकर, धनश्री जाधव आणि हंसिका वजराटकर यांनी भूमिका साकारल्या. प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या भूमिकेला न्याय देत नाट्यप्रयोग अधिक प्रभावी केला. त्यामुळे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले.
यानंतर श्री देव रामेश्वर मंदिर, वेंगुर्ला येथे श्रीराम-सीता मंदिराच्या पुनःप्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ‘रामदर्शन’ नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या वेळीही विद्यार्थिनींच्या सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
या नाट्यप्रयोगाला शाळेचे शिक्षक श्री. संतोष परब यांचे व सिताराम नाईक शिक्षक व शेखर माडकर पालक यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. श्री. नरेश किनळेकर, सर्व पालकवर्ग, आजी-माजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे शाळेचा सामाजिक आणि सांस्कृतिक सहभाग अधिक दृढ झाला असून, मुलींनी पारंपरिक दशावतारी कलेत दाखवलेला सहभाग आणि अभिनय कौशल्य कौतुकास्पद आहे. वेंगुर्ला नं. ४ शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.











