गोवंश तस्करी करणाऱ्याला ५२ हजार रुपयांचा दंड

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोरक्षकांना पून्हा एकदा यश

बोलेरो मालकाला खावटी खर्च भरण्याचे न्यायालयाचे आदेश

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यात अग्रसेर असलेल्या बजरंग दलाच्या सावंतवाडी शाखेला पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे पकडण्यात आलेल्या एका बोलेरो गाडीच्या मालकाला, माननीय न्यायालयाने तब्बल ५२,२०० रुपये खावटी खर्च भरण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंश वाहतूक करणारी बोलेरो पिकअप (क्र. MH-07-AJ-0506) माणगाव येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडली होती. या गाडीतून जप्त करण्यात आलेले देशी गोवंश सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सरसोली धाम येथे ठेवण्यात आले आहेत.

या प्रकरणी, जप्त केलेली बोलेरो गाडी आपल्याला परत मिळावी यासाठी वसीम महम्मद शाह, रा. गोधडवाडी, कुडाळ या संशयित आरोपीच्यावतीने माननीय कुडाळ न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर माननीय कुडाळ न्यायालयात गोरक्षण संस्था ‘ध्यान फाउंडेशन’ यांचे अधिकृत प्रतिनिधी स्वागत नाटेकर यांच्या वतीने वकील श्री. राजू गुप्ता, वकील श्री. पलाश चव्हाण (मालवण) आणि वकील श्री. मिहीर भणगे यांनी आपले युक्तिवाद मांडले. त्यांना वकील श्री. समीर कुलकर्णी आणि वकील सुनील मालवणकर यांचेही सहकार्य लाभले.

आरोपीचे वकील आणि गोरक्षण कार्यकर्ते यांचे वकील या दोघांचेही युक्तिवाद ऐकल्यानंतर, माननीय कुडाळ न्यायालयाने देशी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या बोलेरो मालकाला ५२,२०० रुपये एवढा खावटी खर्च जमा करण्याचे आदेश दिले. हा निर्णय गोरक्षकांच्या प्रयत्नांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.

ही कारवाई बजरंग दलाचे गोरक्षा विभाग प्रमुख श्री. दिनेश गावडे, बजरंग दल संयोजक श्रीकृष्ण धुळपनावर, श्री. साईराज नार्वेकर, श्री. लाडू रायका, श्री. रोहन धुरी, राया शेडगे, श्री. हितेन नाईक आणि श्री. प्रथमेश गावडे यांनी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे केली होती. या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे