खेडमधील ५०३ घरे पूरग्रस्त यादीत

खेड(प्रतिनिधी)नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नगर प्रशासन सज्ज झाली आहे. शहरातील दोन प्रभागातील ५०३ घरांचा पूर प्रभावित घरांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यांची लोकसंख्या ६ हजारांच्या आसपास असल्याने उपाययोजना करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली.

 

मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास जगबुडी नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसत असल्याने व्यापाऱ्यांसह नजीकच्या रहिवाशांची पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेवून नगरप्रशासन उपाययोजना करते. मान्सूनपूर्व कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. नालेसफाई व गटारे स्वच्छता करण्याची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत.

 

शहरातील विशेषतः मटण मच्छी मार्केट, सफा मस्जीद चौक, साठे मोहल्ल्याचा काही भाग, पोत्रिक मोहल्ला, तांबे मोहल्ला, गांधीचौक, निवाचा तळ, वाल्कीगल्ली, गुजरआळीचा काही भाग, पानगल्ली, बाजारपेठ, खांबतळे, नगरपरिषद कार्यालय, तीनबत्तीनाका, खेड-दापोली रोड, ब्राह्मणआळी, कासारआळी, सोनारआळीचा काही भाग, साळीवाडा अशा ठिकाणांचा पूर प्रभावित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.

 

शहरातील दोन प्रभागातील नागरिकांनी कोणतीही आपत्ती ओढवल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.