पालकमंत्र्यांची तत्काळ दखल; स्वखर्चातून बोरवेल

शिरगांव- चौकवाडी ग्रामस्थांची गैरसोय दूर

शिरगाव (प्रतिनिधी)         उन्हाळ्यात गावागावांत पाण्याचा प्रश्न उग्र बनतो आहे. त्यातच देवगड तालुक्यातील शिरगाव-चौकेवाडी (खालचीवाडी) येथील आठ घरांची पाण्यासाठी होणारी दररोजची धडपड आता थांबली आहे. ती एका संवेदनशील निर्णयामुळे.

येथील ग्रामस्थांनी आपली कैफियत भाजप युवा मोर्चाचे देवगड तालुकाध्यक्ष अमित साटम यांच्याकडे मांडली. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला हा प्रश्न त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिला. विशेष बाब म्हणजे, पालकमंत्र्यांनी या समस्येची केवळ दखलच घेतली नाही, तर तात्काळ निर्णय घेत स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून चोकेवाडी- खालचीवाडी येथे बोअरवेल मंजूर केली.

या बोअरवेलचे भूमिपूजन २५ मे रोजी अमित साटम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बूथ अध्यक्ष राकेश चौकेकर, सागर चौकेकर, संतोष चौकेकर, सुमन चौकेकर, महेश चौकेकर, काका चौकेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे यानी पाण्याच्या गंभीर समस्येवर तातडीने उपाय योजना केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री यांचे आभार मानले आहेत.