पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासातून कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी.

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजप युवा मोर्चाचा युवा प्रेरणा मेळावा संपन्न

कणकवली;
जनतेला न्याय कसा द्यायचा याचे शिकवण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटातून उलगडते.अहिल्यादेवी यांच्या इतिहासातून युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी. तुम्हा कार्यकर्त्यांच्या कार्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे प्रतिबिंब दिसले पाहिजे.त्याचे विचार जयंती उत्सव अशा एक दिवसासाठी नको तर वर्षाचे 365 दिवस आत्मसात करून अमलात आणा असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजप युवा मोर्चा यांच्यावतीने प्रहार भवन येथे युवा प्रेरणा मेळावा आयोजित केला होता. याचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार,जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बॅंकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, भाजप युवा मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री भाजपच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, कणकवली मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.


छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यशोक अहिल्याबाई होळकर यांच्यासह महापुरुषांनी सनातन हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीचे रक्षण केले. अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. अहिल्यादेवी यांनी, आदर्शव्रत,पारदर्शक, लोकाभिमुख कारभार केला. त्या उत्तम राजकर्त्या होत्या. त्यांनी केलेल्या राज्यकाभाराचा अभ्यास भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. विचारांचा जागर भाजप युवा मोर्चाने एक दिवस न करता 356 दिवस केला पाहिजे. असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.


मंत्री ना. नितेश राणे म्हणाले,महापुरुषांचा इतिहास हा महान असून या इतिहासाचे वाचन युवा कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन राणेंनी केले. समुद्र किनारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वांत उंच पुतळ्या उभारण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने केले. याशिवाय संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा धाडसी निर्णय भाजपचे सरकार असतानाच घेतला. याचा मला सार्थ अभिमान आहे, असे मंत्री राणे म्हणाले.

अहिल्यादेवींचे चरित्र हे देशवासीयांसाठी मोटीव्हेशन ; प्रमोद जठार
प्रमोद जठार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास महान आहे. त्यामुळे भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी व युवा पिढीने शिवराय, शंभूराजे, अहिल्याबाईंचे जीवनचरित्र वाचले पाहिजे. अहिल्यादेवींचे चरित्र हे देशवासीयांसाठी मोटीव्हेशन आहे. आरएसएस संघटना व भाजप पक्ष हा राष्ट्रहितासाठी काम करतो. भारतीय समाजाला इतिहास विसरण्याचा शाप असून इतिहासाचे विस्मरण समाजाला होऊ नये याकरिता आरएसएस संघटना व भाजप पक्ष महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी त्यांच्या इतिहास सांगण्यासाठी विविध कार्यक्रम घेत आहे. शिवराय, शंभूराजे, अहिल्याबाई यांचे जीवनचरित्र प्रत्येकाने वाचले पाहिजे. ठाकरे कुटुंबाचा शिवसेना पक्ष आहे, पवार कुटुंबावर राष्ट्रवादी पक्ष आहे. मात्र, भाजप हा एकमेव पक्ष आहे, तो कार्यकर्त्यांचा आहे. अहिल्याबाई होळकर यांनी प्रजेची काळजी घेतानाच अादर्श, पारदर्शक, लोकाभिमुख कारभार केला. त्यामुळे त्यांचे जीवनचरित्र युवा पिढीने वाचले पाहिजे. भगवान शंकर हे हिंदूचे प्रतीक असून अखंड हिंदूस्थान करण्यासाठी आता हिंदूंनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रभाकर सावंत म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजपासाठी युवा कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे आणि पाच युवक पक्ष संघटनेशी जोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकेत लखमराजे भोसले यांनी अहिल्याबाई होळकर यांची जयंतीनिमित युवा प्रेरणा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नीलम जाधव, विधी मुद्राळे, नेहा देसाई यांचा भाजप युवा मोर्च्यावतीने पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विधी चिंदरकर हिचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. भाजप युवा मोर्चाचे नूतन तालुकाध्यक्ष पप्पू परब, संतोष राऊळ, दीपक गवस, भाई सावंत यांचा मंत्री राणेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो, भारत माता की, वंदे मातरम अशी घोषणाबाजी करण्यात आली. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन श्रीकृष्ण परब यांनी केले. आभार संदीप मेस्त्री यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.