देवगड / प्रतिनिधी
चार तोळे सोने व मोटरसायकलच्या मागणीसाठी देवगड- सातपायरी येथील सौ. साक्षी सागर अनभवणे या विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी तिचे सासरे रामदास अनंत अनभवणे (६१), सासू रोहिणी रामदास अनभवणे (६२) या संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी ५० हजाराचा सशर्त जामीन शुक्रवारी मंजूर केला आहे. संशयितांच्यावतीने अॅड. अविनाश माणगांवकर, अॅड. सिद्धेश माणगांवकर व अॅड. सौ. श्रुती सिद्धेश माणगांवकर यांनी काम पाहिले.
देवगड- सातपायरी येथील संशयित सागर अनभवणे व फिर्यादी साक्षी यांचा १६ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पती सागर, सासरे रामदास अनभवणे, सासू रोहिणी अनभवणे हे या विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच साक्षी या अडीच महिन्यांची गरोदर असताना तिच्या संमत्तीशिवाय पती सागरने एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केला होता. याबाबतची फिर्याद सौ. साक्षी अनभवणे यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संशयित पती, सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व संशयितांना अटक करून देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने संशयितांना ३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, संशयितांपैकी सासरे रामदास अनभवणे व सासू रोहिणी अनभवणे या संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगाडे करीत आहेत.










