वेतोरे वरचीवाडी येथील बेपत्ता जगन्नाथ नाईक यांचा मृतदेह सापडला जंगलात

वेतोरे वरचीवाडी येथील बेपत्ता जगन्नाथ नाईक यांचा मृतदेह सापडला जंगलात

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी येथील रहिवासी जगन्नाथ काळोजी नाईक वय सुमारे ८० यांचा मृतदेह तेथील जंगल भागात आढळून आला. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन करून पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
दिनांक २३ मे २०२५ पासून नाईक हे बेपत्ता होते. नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला परंतु ते त्या दिवसापासून कुठेच सापडून आले नाहीत. त्यामुळे या बाबतची खबर वेंगुर्ले पोलीस स्टेशनला देण्यात आली होती.
दरम्यान रात्री वेतोरे खडेसलवाडी या ठिकाणी जगन्नाथ काळोजी नाईक यांचा मृतदेह शोध घेणाऱ्या नातेवाईक व ग्रामस्थांना आढळून आला. यावेळी वेंगुर्ले पोलीस भगवान चव्हाण व योगेश सराफदार यांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृतदेह वेंगुर्ले येथील रुग्णालयात आणला आणि शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ व वेंगुर्ले नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. जगन्नाथ नाईक यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.