पाणी योजनांच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करा- उमा घारगे पाटील

कापसाळ येथे पार पडले दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर

चिपळूण,(प्रतिनिधी)– ः ग्रामिण भागात मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजिवन मिशन योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजना दिर्घकाळ टिकण्यासाठी यासंबंधी नियुक्ती केलेल्या समितीचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. दीर्घकालीन संसाधनाच व्यवस्थापन करण्यासाठी पाणी योजनांचे स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण करणे ही काळाची गरज आहे. शाश्वतता केवळ पर्यावरणाशीच संबंधित नसून, सध्याच्या आणि भविष्यातील जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वतता एक आवश्यक भाग आहे, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी सौ. उमा घार्गे – पाटील यांनी कापसाळ येथील प्रशिक्षण शिबीरात केले.

 

 

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्वच्छता समिती मधील पदाधिकारी व कर्मचाऱ्यासांठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वती करण्यासाठी दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचे आयोजन कापसाळ येथील माटे सभागृहात नुकतेच केले होते.

 

गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांच्या हस्ते याशिबीराचा शुभारंभ झाला. या शिबीरास ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षा रक्षक, रोजगार सेवक यांना निमंत्रीत केले होते.

 

यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी घार्गे पाटील म्हणाल्या, येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तरीही काही ठिकाणी उन्हाळ्याच्या कालावधीत पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यासाठी गावोगावी शाश्वत जलस्त्रोत निर्माण करण्याची गरज बनली आहे. कोट्यावधीच्या पाणी योजना केल्या तरी त्यासाठीचा आवश्यक पाणीसाठी गाावातच उपलब्ध करायला हवा. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी सामुहिक प्रयत्न व्हायला हवेत. पुर्वी ग्रामिण भाग वड पिंपळ सारखी झाडे मोठ्या प्रमाणात होती. ही झाडे जमिनीत पाणी साठवून ठेवण्यासाठी मोलाची मदत करतात. त्यामुळे वड पिंपळ सारख्या रोपांची लागवड करून त्याचे जतन करायला हवे. गावातील जलस्त्रोत बळकट झाल्यास ग्रामस्थांना पुरेसा पाणी पुरवठा होण्यास व्यत्यय येणार नाही. त्याचबरोबर पाणी योजनांच्या दुरूस्तीचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्या दिर्घकाळ टिकण्यास मदत होईल. यावेळी गट विकास अधिकाऱ्यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून वडाचे व कांदळवन रोपाचे वाटप करण्यात आले. तसेच शासनाकडून उपलब्ध झालेले रासायनिक फिर टेस्ट किट चे ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आले.

 

यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी स्वप्निल कांबळे व गट संसाधन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.