शिक्षक संघटनेने घेतली ना. नितेश राणे यांची भेट
सावंतवाडी । प्रतिनिधी : शिक्षकांनी संच मान्यते विरोधात पुकारलेल्या आंदोलनाबाबत बोलताना मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यास आपण सक्षम असतानाही, आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले. शिक्षकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महादेव देसाई आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची सावंतवाडीतील पर्णकुटी विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, संच मान्यते विरोधात आंदोलन छेडण्यात आले. हा प्रश्न आपण मुख्यमंत्री आणि सरकार दरबारी पाठपुरावा करण्यास सक्षम असताना, शिक्षकांनी आंदोलन छेडणे योग्य नाही असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सकारात्मक काम करीत असताना उगाच आंदोलने आणि निदर्शने नको. आपल्यापर्यंत अडचणी मांडल्यास त्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहू, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले.












