राष्ट्र हिताचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला भाजपा विचारधारेशी जोडा-आम. रविंद्र चव्हाण

राजापूर (वार्ताहर): पहेलगाम हल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद हा जगातून समुळ नष्ट केला पाहिजे या भावनेने जगाचे नेतृत्व करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये पक्षसंघटना अधिक मजबुत करताना राष्ट्रहिताच्या विचाराने प्रेरित असणाऱ्या आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या अशा प्रत्येकाला आपल्या विचारधारेशी जोडण्याचे काम प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने केले पाहिजे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांनी राजापूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना केले.
ते पुढे बोलताना म्हणाले, भारत आज विकासाकडे झेपावत असताना देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये उच्च स्थानावर नेण्यासाठी पंतप्रधान मोदी करत असताना समाजाला त्या दिशेने नेण्याचे काम आपण साऱ्यांनी मिळून केले पाहिजे. पहेलगाम हल्यानंतर आपण देशात तिरंगा रॅली काढून भारतीय सैन्याला पाठिंबा देवून जगाला आपली एकी दाखवून दिलेली आहे.
गेल्या अकरा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. हे सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपा कार्यकर्ता म्हणून आपण प्रत्येकाने केले पाहिजे. येत्या ५ जून ते १५ ऑगस्ट या काळात संकल्प ते सिध्दी या उपक्रमांर्गत समाजाच्या प्रत्येकाच्या घटकापर्यंत पक्षाने केलेले काम पोहचविले पाहिजे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाला आणि राज्याला विकासाच्या नव्या पर्वाकडे घेवून जात आहेत. सामान्य जनतेलाही या विकास पर्वासोबत घेवून जाण्याची जबाबदारी कार्यकर्त्याची असून ती आपण पार पाडली पाहिजे असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.