शासनाच्या कृषी विभागाच्या फळझाडे लागवडीसाठी १०० टक्के अनुदानाचा लाभ कोकणातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा

उमराठ सरपंच जनार्दन आंबेकर

गुहागर (प्रतिनिधी) : भारत हा कृषी प्रधान देश आहे. कोकणात पूर्वी शेती हाच मुख्य व्यवसाय होता. अगदी आपले आजी-आजोबा ते आई-वडीलांच्या पिढीपर्यंत सर्वच शेतकरी प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करून भात, नाचणी, वरी, हरीक तसेच चवळी, उडीद, कुळीथ, तुरडाळ इत्यादी कडधान्ये आणि शेताच्या बांधावर वांगी, भेंडी, गवार, मिरची इत्यादी भाज्या, परसातील पालेभाज्या, पावसाळ्यात रानमाळावर उगवणाऱ्या रानभाज्या तर बांधावरचे आंबाडा ज्यांचा दोर किंवा बंध आणि चूल व दिवाबत्ती पेटविण्यासाठी उपयोग व्हायचा. या सगळ्या साध्या- सोप्या जीवनशैलीत अशिक्षितपणा किंवा शिक्षण बेताचे असताना सुद्धा ग्रामीण भागातील सर्व शेतकरी कुटुंबे सुखी, समाधानाने आणि आनंदी जीवन जगत होती. कोकणातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या फळझाडे लागवडीसाठी १०० टक्के अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केले आहे.
निसर्गसृष्टीत ग्लोबल वार्मिंगमुळे होणारे फेरबदल आणि बदलती जीवनशैली, शिक्षणाचा प्रचार व प्रसार, नवनवीन शोध-संशोधने, कष्टांची, श्रमांची कामे करण्याकडे दुर्लक्ष ईत्यादी कारणामुळे सद्याची तरूण पिढी नोकरी-धंदा, व्यवसायासाठी शहरांकडे आकर्षित होताना दिसतो आहे. शिवाय नैसर्गिक आपत्ती, वानर, माकडे यांची वाढती प्रजाती आणि उपद्रवी रानडुक्कर, रानगवे यांचा त्रास,यांचा बंदोबस्त करण्यासाठी सासन अजून ठोस उपाययोजना करताना दिसत नाही शिवाय मोलमजुरीसाठी उपलब्ध नसलेले कामगारवर्ग इत्यादी कारणांमुळे शेती/बागायती करणे कठीण होतं चालले आहे. वस्तुस्थिती खरी आहे. तरी पण आपण आपल्या ओसाड पडीक जमीनीं वापरात आणायच्या की नाहीत? शासनाच्या कृषी विभागाकडून मिळणाऱ्या १००% अनुदानातील आंबा, काजू, नारळ,सुपारी,आवळा, कोकम (रातांबा), जांंभूळ इत्यादी फळझाडे तर खैर, साग, बांबू इत्यादी उत्पन्न देणारे वृक्ष लागवड करण्यासाठी सुद्धा अनुदान मिळते. याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घेऊन आपापल्या ओसाड पडीक जमीनींवर फळझाडे लागवड करणे हिताचे आहे. आपले कृषी अधिकारी उत्तम प्रकारे जनजागृती साठी प्रचार आणि प्रसार करत आहेत त्यांना साथ देऊन आपण आपल्या ग्रामपंचायती मार्फत प्रस्ताव करण्यासाठी कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी जरूर संपर्क साधावा आणि ओसाड पडीक जमीनींवर फळझाडे लावून फलोत्पादन करून कोकणाचे नंदनवन करावे, असे आवाहन उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी कोकणातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.