विद्यार्थ्यांनी देश हिताच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपा- अभिनेते विजय गोखले

चिपळुणातील चतुरंग प्रतिष्ठानच्या शिष्यवृत्ती प्रधान कार्यक्रमात केले आवाहन

चिपळूण (वार्ताहर) : आपल्या जीवनाची दिशा काय आहे हे ओळखून विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करा. त्या मार्गाने वाटचाल करताना प्रचंड मेहनत घ्या. कारण ध्येय प्राप्ती झाल्यानंतर पैसा, प्रसिध्दी नाव यश, सुख, समृध्दी आपोआप तुम्हाला निर्माण होईल. प्रत्येक विद्यार्थ्यांनी देशहिताच्यादृष्टीने सक्रिय राहून सामाजिक बांधिलकी जपायला हवी, असे आवाहन दिग्दर्शक, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी केले. चतुरंग प्रतिष्ठानच्यावतीने शहरातील ब्राम्हण सहाय्यक संघाच्या सभागृहात निर्धार व निवासी अभ्यासवर्गातीत गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्याची जडणघडण करत असताना त्यांच्यावर बंधने न लादता त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांना कायम प्रोत्साहन द्या. आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या जाणीवेतून समाजाच्याप्रती काहीतरी चांगले करण्याची निष्ठा ठेवा. कारण आजकाल प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवतोय, सत्कार्याची सुरुवात स्वतःपासून करावी असे कोणालाही वाटत नाही, हे सर्वात दुदैव आहे. सामन्य माणसाने म्हणायचे की, सरकारने चांगले करावे तर सरकारने म्हणायचे की सामान्य माणसाने चांगल करायल हवे, एकीकडे सामान्य माणसाने अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून भ्रष्टाचार सांगायचा तर दुसरीकडे टेबलाखालून पैसे देऊन स्वताची कामे करून घ्यायची हे वास्तववादी चित्र बघायला मिळते. कोणालाही काहीतरी वेगळे करावे जे समाजाच्या हिताचे असेल अस वाटत नाही. यासाठी प्रत्येकाने विचार करायची वेळ आली आहे. मी समाजासाठी देशासाठी काय करतो. यासाठी सक्रिय राहून सामाजिक बांधिलकी जपायला हवी. चांगला माणूस बनण्यासाठी तसेच चांगले निर्णय घेण्यासाठी स्वत:ला घडवायला लागते. हे तत्व विद्यार्थ्यांनी अंमलात आणले पाहिजेत. अशा स्थितीत चतुरंग सारखी संस्था शैक्षणिक क्षेत्रातील हिताचे कार्य हातात घेत सामाजिक बांधिलकी जपत आहे. यातूनच चतुरंग विद्यार्थी घडवणारी सर्वोत्तम संस्था म्हणून सर्वदूर पोहचली आहे. पूर्वजांनी सांगतलेल्या तत्वाचे पालन करा. आज बदलत्या शैलीमुळे जीवनही गतीमान होत चालले आहे. जीवन कसे असावे यासाठीची नियमावली पूर्वजांनी सांगून ठेवली आहे. त्यांनी सांगितलेल्या म्हणी, वाक्यप्रचार याचा अभ्यास केला तरी जिवन सार्थकी लागले. मात्र काळाच्या ओघात आपण याच नियमावली विसरत चाललोय. जगाच्या स्पर्धेत इंग्रजी हवेच आपल्या भाषेचा अभिमान जरुर असावा तो आहेच, मात्र इंग्रजी भाषाही अवगत हवीच. जगाच्या स्पर्धेत इतर देशात इंग्रजी भाषा बोलली जाते. त्यासाठी ती देखील भाषा यायला हवी.
दरम्यान, प्रा. दिपक मराठे व सीए अमित ओक यांनी देखील विद्यार्थ्यांना मौखिक मार्गदर्शन केले. यावेळी चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिली जाणारी स्व. प्रतिभा ‘मोने स्मृतीप्रित्यर्थ शिष्यवृत्ती कोमल संतोष अपराज जनता विद्यालय-त्रिबक, पायल पंढरीनाथ धामणस्कर न्यू इंग्लिश स्कूल तळवली, रुद रघुनाथ कुंभार रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली तसेच स्व. चिंतामणी काणे तथा काणेमामा स्मृतीप्रित्यर्थ शिष्यवृत्ती आर्यन मिलिंद मोरे-यु इंग्लिश स्कूल वहाळ, योगिनी दिपक दुर्गोळी न्यू इंग्लिश स्कूल-वीर, प्रेरणा पाडुरंग कोदारे न्यु इंग्लिश स्कूल खंडोत्री यांना प्रदान करण्यात आली.