Dapoli: A leopard that fell into a well in Kondhe Gorivale Wadi was rescued
दापोली | प्रतिनिधी: कोंढे गोरीवले वाडीतील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढून जीवदान दिल्याने वन विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. दापोली तालुक्यातील कोंढे गोरीवले वाडी येथील शांताराम पिरजानकर यांच्या मालकीच्या जमिनीतील विहिरीत बिबट्या पडला होता. याबाबतची माहिती दापोली वन विभागाला देण्यात आल्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व वन्य जिव रक्षक यांनी घटनास्थळी जाऊन ३ तास अथक प्रयत्न करीत ४० फूट खोल विहिरीतून बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर दापोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत आणून पशुवैद्यकीय तपासणी करण्यात त्यानंतर नैसर्गिक अधिवासात बिबट्याला सोडण्यात आले.
सदरचा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाचा असल्याचे प्राथमिक तपासणीमध्ये निदर्शनास आले.
विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे व साहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन सुरक्षित पार पडले. या कामगिरीसाठी दापोली परिक्षेत्र वनाधिकारी पी. जी. पाटील, दापोली वनपाल साताप्पा सावंत, मंडणगडचे वनपाल अ. रा. दळवी, खेडचे वनपाल सु. आ. उपरे, बांधतिवरे वनरक्षक जळणे, ताडीलचे वनरक्षक भिलारे, खेडचे वनरक्षक जगताप, कोंगळेच्या वनरक्षक शुभांगी गुरव, पालघरचे वनरक्षक वि. द. झाडे, काडवली वनरक्षक ढाकणे, खवटी वनरक्षक रा. प. बंवर्गेकर आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनी तसेच वन्य जिव रक्षक संघटनेचे मिलिंद गोरीवले. किरण करमरकर. प्रितम साटवीळकर. तुषार महाडिक या सभासदांनी मेहनत घेतली.












