Interviews for the post of Chancellor of Konkan Agricultural University will start shortly
राज्यपाल महोदय घेणार अंतिम ५ जणांच्या मुलाखती
दापोली | प्रतिनिधी : गेले अनेक दिवस उत्कंठा शिगेला पोहचलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू पदाची निवड आता अंतिम टप्प्यात आली आहे.
मार्च महिन्यात सुरू करण्यात आलेली ही कुलगुरू निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून राज्यपाल महोदयांकडे आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी ५ जून रोजी दुपारी अडीच वाजता राजभवन येथे कुलगुरू निवड समितीकडून शिफारस करण्यात आलेल्या पाच जणांच्या मुलाखती होणार आहेत. आज राज्यपाल रमेश बैस हे या मुलाखती घेणार आहेत. या मुलाखती घेतल्यानंतर कुलगुरू पदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल. सोमवारी संध्याकाळी उशिरा किंवा मंगळवारी राजभवनकडून कुलगुरू पदाचे नाव घोषित केले जाण्याची शक्यता आहे. तूर्तास या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पदाचा कार्यभार एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्याकडे आहे.
गेल्या रविवारी कुलगुरू निवड समिती समोर पंचवीस इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या पंचवीस जणांमधून पाच जणांची निवड करून निवड समिती या पाच नावांची शिफारस राज्यपाल महोदयांकडे करण्यात आली आहे.
कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपाल महोदयांकडून नियुक्त करण्यात आलेला शोध समितीच्या अध्यक्षपदी कृषी अनुसंधान परिषदेचे निवृत्त डायरेक्टर जनरल डॉ.एस. अय्यप्पन तर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहसंचालक डॉ.पी एन साहू यांची समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. तसेच अन्य दोन ते तीन कृषी शास्त्रज्ञांचा या समितीमध्ये समावेश आहे.
त्यानंतर या पाच जणांची मुलाखत घेऊन राज्यपाल महोदयांकडून यातील एका व्यक्तीच्या नावावर कुलगुरू पदासाठी अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल.









