लाकूड माफिया आणि वनविभागाच्या संगनमताची तालुक्यात चर्चा
गृहराज्य मंत्र्यांच्या तालुक्यातील या गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
मंडणगड । प्रतिनिधी : शासनाच्या वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला मंडणगड तालुक्यात मात्र वनविभागाने घरचा आहेर दिला आहे. पर्यावरणस्नेही मंडणगडमध्ये वृक्षतोडीचे विदारक चित्र पुढे येत आहे. शेकडो टन लाकूड मोठ्या महानगरांमध्ये अवैद्यरित्या निर्यात केले जाते. लाकूडमाफियांना अभय देण्याचे कारण काय, याबाबतीत वनविभागाची भूमिका स्पष्ट होत नाही, त्यामुळे संगनमतातून लाकूडतोड व निर्यातीची मोहीम राबवली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात मंडणगड हे दस्तुरखुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे गाव असल्याने मंत्रीमहोदयांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील या वृक्षतोडीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असताना प्रशासनाचा एक अधिकारी बेजाबदारपणे खोटे बोलून या विषयी टोलवाटोलवी करत असल्याचे निदर्शनात आले आहे. खोटे बोलण्यात माहीर असलेल्या या अधिकाऱ्याने लाकूड माफियांना अवैध लाकूड व्यापार करण्याची जवळपास मुभा दिल्याची चर्चा आता जाहीरपणे होऊ लागली आहे. या अधिकाऱ्याच्या अनेक चुकीच्या बाबी झाकण्यासाठी हे व्यापारी त्या बदल्यात त्यास मदत करत असल्याचेही समोर आले आहे. याची अधिकाऱ्याची व येथील एकूणच अवैध लाकूड व्यवसायाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी यानिमित्ताने वन्यप्रेमी आता करू लागले आहेत.
तालुक्याला निसर्गाने भरभरून नैसर्गिक साधनसंपत्ती दिली आहे. शासनदरबारी डोंगरी म्हणून नमूद असलेल्या तालुक्याला मागील काही वर्षांपासून लाकूडतोडीचे मात्र ग्रहण लागले आहे. जंगले, डोंगर वृक्षतोडीने बकाल केली जात आहेत. यावर्षी पाऊस सुरु झाला तरी वृक्षतोड पाहायला मिळतेय, येथील जंगलतोडीचे प्रमाण एवढे वाढले आहे कि, साधे महामार्गावरून प्रवास करताना समोरील दिसणारा डोंगर वृक्ष तोडीने बकाल झाल्याचे प्रवाश्यांच्या सहज निदर्शनात येते, इतके वनविभागाचे पारदर्शक काम तालुक्यात सध्या सुरु आहे. शेकडो टन लाकूड रात्रीच्या अंधारात मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरात तर गुजरात सारख्या परराज्यातही वाहतूक केले जाते, यातील बहुतांशी वाहतूक ही विनापरवाना अवैद्यरित्या केली जाते.
वनविभागाचे ठिकठिकाणी आवश्यक असलेले चेकनाके उपलब्ध नसल्याने अवैध वाहतुकीचे प्रमाण अधिक वाढले आहे, अवैध वृक्षतोड आणि त्यांची वाहतूकीची बाब सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार वनविभागाच्या निदर्शनात आणून दिली मात्र वनविभागाच्या उदासीन कारभाराच्या पवित्र्यामुळे अवैध लाकूड वाहतुकीस दुजोरा मिळत राहिला, वनविभागाने अवैध वृक्षतोड आणि वाहतूक याविरोधात कठोर कारवाईचा बडगा उभारण्याची गरज आहे. सर्वच नियम धाब्यावर बसुवून केलेली येथील अवैध वृक्षतोडीमुळे येथील जैवविविधता नष्ट होण्याचा धोका संभवतो, वनांचे रक्षण न केल्यामुळे वातावरातील बदलाबरोबरच जंगली श्वापदे मानवी वस्तीत येणाच्या घटना वाढल्या आहेत, तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यांची शिकार केल्याच्या अनेक घटना आहेत, निसर्गाला आव्हान देण्याच्या या मानवी कृत्याला आता कुठेतरी थांबवण्याचे गरजेचे आहे.










