परशुराम मंदिरात भाविकांकडून होणार जंगी स्वागत
चिपळूण (प्रतिनिधी) : अयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहोळा दि. २२ जानेवारी २०२४ ला भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. या लोकार्पण सोहोळ्याचे निमंत्रण घेऊन अयोध्येतील अक्षतांचा कलश ३० नोव्हेंबर रोजी परशुराम भूमीत दाखल होत आहे. चिपळूण तालुक्यातील कै. जयंत जोशी चौक, श्री परशुराम मंदिर येथे सकाळी ११ वाजता रामभक्तांमार्फत त्याचे जंगी स्वागत होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद, उत्तर रत्नागिरीतर्फे देण्यात आली आहे.
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहोळ्याचे निमंत्रण संपूर्ण देशवासियांना दिले जाणार आहे. यासाठी देशभर अक्षतांचे वाटप केले जात आहे. या अक्षतांचा कलश चिपळूण तालुक्यातही दाखल होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गावागावातून, सर्व वाडी, सर्व वस्तीमध्ये १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत वितरित करण्यात येणार आहेत. या अक्षता कलशाचे स्वागत भगवान श्री परशुराम मंदिर व सर्व रामभक्तांनी मिळून करण्याचे नियोजन आहे. तरी जास्तीत जास्त राम भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा मंत्री उदय चितळे, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बिपीन पाटणे यांनी केले आहे.











