अलसुरे-शिरीषकरवाडी येथील समाज मंदिराचे मान्सूनपूर्व पावसात छत कोसळले

सुमारे ७ लाखांचे नुकसान; नवीन समाज मंदिर इमारतीसाठी निधी मिळावा- दिनेश शिरीषकर

 

चिपळूण (प्रतिनिधी):– खेड तालुक्यातील अलसुरे-शिरिषकरवाडी येथील समाज मंदिराचे दिनांक ३० मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसात नुकसान झाले आहे. या समाज मंदिराच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी मिळावा अशी मागणी रोहिदास समाजसेवा संघ ता. खेड या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिनेश शिरीषकर यांनी केले आहे.

 

गेल्या काही वर्षांपूर्वी अलसुरे शिरीषकरवाडी येथे समाज कल्याण विभागाच्या निधीतून समाज मंदिर बांधण्यात आले. या समाज मंदिरात समाज उपयोगी उपक्रम राबवले जात असत. मात्र, गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसात समाज मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कौलांचे छत पूर्णतः कोसळले आहे. याची माहिती येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिल्यानंतर महसूल विभागाने पंचनामा केला असून या समाज मंदिराचे सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसात या समाज मंदिराच्या दुरुस्ती अथवा नवीन समाज मंदिर बांधकामासाठी निधी मंजूर व्हावा, अशी मागणी अलसुरे शिरीषकरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.