लांजा येथील मंडळ अधिकाऱ्यांची एक्टिवा दुचाकी चोरीला 

लांजा (प्रतिनिधी) लांजा शहरातील आड परिसरातून एक्टिवा दुचाकी चोरीला गेल्याचा घटना घडली असून लांजा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची नोंद करण्यात आली आहे .

याबाबतची तक्रार कुलदीप नामदेव गायकवाड (व ४० राहणार लांजा माऊलीनगर, मुळगाव नांदेड उज्वल नगर ,जिल्हा नांदेड) यांनी दाखल केली आहे.

लांजा तहसील येथे मंडळ अधिकारी म्हणून काम पाहणारे गायकवाड हे दिनांक ६ जून रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या दरम्याने आपली एक्टिवा मोटरसायकल (क्रमांक एम एच ०८- ए डब्ल्यू- ४३७०) घेऊन लांजा आडाजवळ असणाऱ्या कृषी विभागाच्या नर्सरीमध्ये झाडे आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आपली एक्टिवा दुचाकी त्या ठिकाणी असलेल्या एका झाडाजवळ उभी केली होती. त्यानंतर ती झाडे आणण्यासाठी नर्सरीमध्ये गेले होते.

मात्र झाडे घेऊन जेव्हा परत आले तेव्हा त्यांची एक्टिवा दुचाकी लावलेल्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली .मात्र त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुलदीप गायकवाड यांनी लांजा बाजार पेठ, बाजारपेठेतील गॅरेज यांच्याकडे देखील चौकशी केली. मात्र त्यांची एक्टिवा दुचाकी कुठेही आढळून आलेली नसल्याने त्यांनी या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात एक्टिवा दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.