श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थेचा पुढाकार
संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. भगवान महाराज कोकरे यांनी दिली माहिती
चिपळूण (प्रतिनिधी)–ः श्री संत ज्ञानेश्वर माऊली जिवनमुक्ती धाम सेवा संस्थान यांच्या वतीने लोटे- परशुराम येथे अध्यात्मिक वारकरी गुरूकूलचा भव्य शुभारंभ गुरूवारी १२ जून रोजी होणार आहे. ह.भ.प पुरूषोत्तम महाराज मोरे व माणिक महाराज मोरे तसेच प्रसिद्ध उद्योजक कैलासशेठ नंदा यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होइल. या संस्थेच्या माध्यमातून अनाथ, निराधार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष भगवान महाराज कोकरे यांनी पत्रकारांना दिली.
संस्थेतर्फे लोटे येथे गोशाळा चालवली जाते. या संस्थेच्या माध्यमातून अध्यात्मिक वारकरी गुरूकूल सुरू केले जात आहे. यानिमीत्त १२ रोजी सकाळी ८ वाजता गणेशपूजन व श्री सत्यनारायण पूजा होइल. सकाळी १० वाजता ह.भ.प दादा महाराज मोरे (कोल्हापूर) यांचे किर्तन होइल. दुपारी १२ वाजता उद्घाटन समारंभ होइल. दुपारी महाप्रसाद, ४ वाजता वारकरी भजन, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ होइल.
यावेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे संपर्क प्रमुख ह.भ.प. जालिंदर काळोखे पाटील, विजय जगताप, रूपेश राजेशिर्के, भागवत महाराज भारती, ज्ञानेश शिगवण, प्रकाश सोलकर, विष्णू सोलकर, किशोर चौगुले, ज्ञानेश्वर रामाणे, राजेंद्र राजेशिर्के, गणपत येसरे, पांडुरंग रेवाळे, शिवाजी पालांडे, दत्ताराम आंब्रे, शशिकांत महाडीक, मोघरे गुरूजी, प्रसाद दळवी, पालकर महाराज, जनार्दन आंब्रे, आदी वारकरी सांप्रदायातील महाराज उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील किर्तनकार, गायक, पखवाजवादक यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
अध्यात्मिक वारकरी गुरूकूलच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शालेय शिक्षणासह अध्यात्मिक शिक्षण, निवास व्यवस्था, जेवण अन्य सुविधा मोफत उपलब्ध केल्या जाणार आहेत. या माध्यमातून गरजू विद्यार्थ्याना शाळा महाविद्यालयात प्रवेश घेऊन शालेय शिक्षणासह हरिपाठ, किर्तन, प्रवचन, तबला, शास्त्रीय गायन, वारकरी चाली, रामकथा, भगवतगिता, संत चरित्र, शिवशंभू व शिवचरित्र, शिवकालीन युद्धकला, हार्मोनियम, पखवाजवादन शिकवले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरजू, अनाथ मुलांनी येथे प्रवेश घ्यावा, असे आवाहन भगवान कोकरे महाराज यांनी केले आहे.













