शिवाईनगर-खोंडे रस्त्याची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे जीवन आलेय धोक्यात

तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात करण्याची नागरिकांची मागणी
खेड (प्रतिनिधी)
खेड शहरातील शिवाईनगर ते खोंडे या मुख्य मार्गाची पूर्णतः दुरवस्था झाल्यामुळे या रस्त्यावरून दररोज ये जा करणाऱ्या हजारो नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की, सर्वदूर मोठमोठे खड्डे, पावसाळ्यात होणारा चिखल आणि रस्त्यावरचे पाणी यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
खास करून ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शैक्षणिक संस्था श्री. रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्या मंदिर (पूर्व प्राथमिक व प्राथमिक), कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर
(माध्यमिक), कै. राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर (उच्च माध्यमिक) तसेच सहजीवन शिक्षण संस्थेचे आयसीएस महाविद्यालय या सर्व संस्था या मार्गावरच आहेत. २००० पासून या रस्त्याचा वापर दररोज सुमारे एक ते दीड हजार विद्यार्थी करत आहेत.
विद्यार्थी चालत, सायकलने किंवा वाहनांनी या मागनि ये-जा करत असताना अनेकदा अपघात घडले आहेत. खड्ड्यांमुळे सायकलस्वार विद्यार्थी घसरून पडतात, वाहनांची तोल जातो, तर पावसाळ्यात चिखलामुळे वाटच दिसत नाही. रस्त्याचे नूतनीकरण गेली अनेक वर्षे झालेले नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.
या पार्श्वभूमीवर ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी एकमुखाने हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. विद्यार्थ्यांचे जीव वाचविण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाढत्या वाहतुकीचा विचार करता या रस्त्याचे मजबुतीकरण व नूतनीकरण त्वरित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तरी स्थानिक प्रशासनाने या मागणीची तत्काळ दखल घ्यावी आणि शिवाईनगर खोंडे रस्त्याचे दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घ्यावे, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.