निवळी नं.१ शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी देणगीतून केली शाळेची रंगरंगोटी

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील केंद्रशाळा निवळी नं.१ ही १५० वर्षापूर्वी स्थापना झालेली शाळा असून या शाळेतून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतलेआहे.यामधील अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या देणगीतून नुकतीच जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा निवळी नं.१ची रंगरंगोटी केली. त्यामुळे शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत.
पुस्तकातील शैक्षणिक माहिती भिंतीवर चित्रित झाल्यामुळे आज अनेक विद्यार्थी शाळेकडे आकर्षित झाले आहेत. ही देणगी जमा करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती निवळी, शिक्षक पालक संघ आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि काही माजी विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांची भेट घेणे, त्यांना फोनवरून संपर्क साधने किंवा मीटिंगचे आयोजन करून मदतीसाठी आवाहन करणे इत्यादी प्रयत्न करण्यात आले. त्याला माझी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आणि रंगरंगोटीसाठी खूप मोठा निधी जमा झाला.या अगोदरही मिशन आपुलकी सारख्या उपक्रमाला माजी विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देऊन आवश्यक भौतिक तसेच शैक्षणिक सुविधांची पूर्तता केली होती. या कामी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. प्रणय परब,उपाध्यक्ष सौ.मंजुषा लोकरे, मुख्याध्यापक संदिप गायकवाड ,सहकारी शिक्षक विकास महाडिक, रविंद्र जोंधळे, रामकिसन शेकडे,माजी विद्यार्थी अर्जुन कोदारे, सुधीर गायकवाड, सुनिलकुमार सुर्वे, संकेश गायकवाड, श्री.चंद्रकांत पवार, श्री.सचिन सुर्वे, श्री.दिपक घाणेकर, श्री.विजय कोदारे,श्री.दिनेश लाखण, किरण लाखण इत्यादींचे मोलाचे योगदान प्राप्त झाले. नुकतेच अमर कांबळे- नांदगाव आणि माजी विद्यार्थी चंद्रकांत पवार यांच्या प्रयत्नाने शाळेला रिझर्व बँक मुंबईकडून तीन संगणक आणि एक प्रिंटर देणगी रूपात प्राप्त झाले. ग्रामस्थांच्या या योगदानाबद्दल केंद्रप्रमुख श्रीम.जयश्री गावडे मॅडम आणि सौ. मानसी शिंदे विस्तार अधिकारी वहाळ यांनी ग्रामस्थांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले आहे.