आडाली एमआयडीसी अवैध माती उत्खनन !!

५६लाख रुपये दंड महसूल विभागाने केली कारवाई

दोडामार्ग प्रतिनिधी
तालुक्यातील बहुचर्चित आडाळी एमआयडीसी क्षेत्रात अवैध माती उत्खनन सुरू असून याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. महसूल विभागाने या क्षेत्रात तब्बल १५६५. ६४ ब्रास अवैध मातीसाठी जप्त करून एमआयडीसी विभागास एकूण ५६ लाख ३६ हजार ३०४ रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड सात दिवसात भरणा न केल्यास एमआयडीसी विभागाविरुद्ध फौजदारी कारवाई करून या रकमेचा बोजा संबंधित सातबारावर ठेवण्यात येईल असा आदेश तहसीलदार यांनी काढला आहे. मुदत उलटूनही अद्याप एमआयडीसी विभागावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

आडाळी पंचक्रोशी अवैध माती उत्खननाला वेग असून परिसरात दिवसा रात्री मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केले जाते. या परिसरातील मातीला चांगली ग्रेड असल्याचेही समजते. त्यामुळे ही माती उत्खनन करून, गोव्यातील काही दलालांना हाताशी धरून रेडी येथे पाठविले जात असल्याच्या चर्चा आहे. कारण महसूलच्या गाव पातळीवरील कर्मचाऱ्याला (तलाठी) असे अवैध माती उत्खनन का बरे दिसत नसावे? की जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.


आडाळी एमआयडीसीतील अवैध माती उत्खननावर महसूलने मोठी कारवाई केली. यात तब्बल १५६५.६४ ब्रास अवैध माती साठा जप्त केला व एमआयडीसी विभागास ५६ लाख ३६ हजार ३०४ रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच सात दिवसांत हा दंड भरण्याचा आदेश तहसीलदार यांनी दिला आहे. मात्र अद्यापपर्यंत हा दंड भरण्यात आला नसल्याचे समजते

तलाठी व मंडळ अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
माती उत्खननासाठी स्थानिकांचा जेसीबी वापरला जात आहे अशा चर्चा आहेत. शिवाय कोणत्याही गावात स्थानिक पातळीवर चोरून महसूल बुडवला जात असेल तर त्याची इत्यंभूत माहिती तेथील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना मिळते. मात्र आडाळीतील हे दोन्ही महसूलचे अधिकारी याला अपवाद राहिले आहेत असे म्हणावे लागेल. कारण दिवसाढवळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात माती उत्खनन होऊनही या अधिकाऱ्यांना काहीच माहिती नसणे शिवाय या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातच कायम अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध माती उत्खनन होत असल्याचे प्रशासनाच्या कारवाईने समोर येत आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाचा महसूल बुडवण्यात हे खरच सामील नसावेत का? असा सवालही उपस्थित होत आहे. याबाबतउलट सुलट चर्चा सुरू आहे

तालुक्यातील युवक गोवा राज्यात जातात त्यांना येथे युवकांना रोजगार मिळावा यासाठी आडाळी येथे एमआयडीसी उभारण्यात आली. मात्र चांगले उद्योग सोडून नको ते उद्योगांचे प्रताप येथे सुरू झाले आहेत. उद्योग सुरू व्हावेत यासाठी वारंवार आंदोलन करणारे अवैध माती उत्खननावर मात्र गप्प बसले आहेत. त्यांच्या गुप्तता बाळगण्याचे नेमके कारण कोणते असावे? हे प्त्यांना माहित नसावेत का? की केवळ राजकीय स्टंट म्हणून ते वारंवार आंदोलन करतात? असे अनेक सवाल आता सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे