राजापूर अर्बन बँकेची AI (Artificial Intelligence) सिस्टीम कार्यान्वीत – अध्यक्ष संजय ओगले

राजापूर (प्रतिनिधी): ग्राहक सेवेला प्राधान्य देत आपल्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक कार्यप्रणालीचा वापर करणाऱ्या येथील राजापूर अर्बन को. ऑप. बँकेने आता नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत Al (Artificial Intelligence) सिस्टीम ही तांत्रिक नविन सेवा दि सुरु केली आहे. तशी माहिती बँकेचे अध्यक्ष संजय ओगले यांनी दिली आहे.

शुक्रवारी १३ जून पासून बँकेने ही सेवा कार्यान्वयीत केली आहे. या नवीन तंत्रज्ञानाद्वारे बँकेच्या कर्जदारांना त्यांचे दरमहिन्याचे कर्ज हफ्त्याकरीता रिमाइंडर कॉल आणि मेसेज जाणार आहेत. यासाठी या बँकेने AVS INSOTECH PVT.LTD या कंपनीसोबत करार केला असून याद्वारे बँकेच्या कर्जदारांना रिमाईंडर कॉल-मेसेजसोबतच ग्राहकांचा यावरील प्रतिसाद घेण्यात येणार असून त्यांचा कर्ज हप्ता, थकित हप्ता, ते कर्ज हफ्ता कधी भरणार आहेत? याचीदेखील डिजीटल पध्दतीने नोंद घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांनी कर्ज हफ्त्यासाठी दिलेल्या तारखेला त्यांना पुन्हा रिमाइंडर कॉल-मेसेज करण्यात येणार आहे. यामुळे कर्जदारांनाही त्यांच्या कर्जाबाबत तसेच भरलेल्या वा थकीत असलेल्या त्या महिन्याच्या हप्त्याबबात या सेवेद्वारे माहिती मिळणार असुन त्यांचे कर्ज खाते सुरळीतपणे सुरू ठेवता येणार आहे. अशी माहिती ओगले यांनी दिली आहे. सदरची सेवा देणारी सहकारी बँकांमध्ये राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि., राजापूर ही पहिली बँक ठरली आहे.