ग्राहक पंचायत सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर यांची निवड
सावंतवाडी: ग्राहकांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या ग्राहक पंचायत संस्थेच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे झालेल्या बैठकीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
यावेळी बोलताना नवनियुक्त तालुकाध्यक्ष अमोल केसरकर यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले. तसेच, लवकरात लवकर तालुका संघटनेची बांधणी करून ग्राहकांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीला जिल्हा सल्लागार ॲड. समीर वंजारी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा. रूपेश पाटील, सहसंघटक प्रमोद मोहिते, जिल्हा संघटक विष्णूप्रसाद दळवी यांच्यासह सुकन्या टोपले, स्वप्नील लात्ये, प्रताप सावंत, देवेंद्र नाईक, दत्ताराम नाईक, विनायक गांवस, साबाजी परब आदी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. अमोल केसरकर यांच्या निवडीमुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्राहक चळवळीला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.














