प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी : शेळेवाडी येथील ओंकार कृष्णात बरगे (वय २८) आणि एका अल्पवयीन मुलीने तरसंबळे (ता. राधानगरी) येथील मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर जंगलात एकाच दाेरीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याची वर्दी तरसंबळे गावचे पोलिस पाटील गुरुनाथ कांबळे यांनी राधानगरी पोलिसांत दिली. या घटनेमुळे राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येची घटना चार दिवसांपूर्वी झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.याबाबत राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळेवाडी येथील ओंकार कृष्णात बरगे व एका अल्पवयीन मुलीने तरसंबळे येथील हद्दीत जंगल परिसरामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे एका शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्याने याची माहिती पोलिस पाटील गुरुनाथ कांबळे यांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याने परिसरात दुर्गंधी येत होती. त्यामुळे तेथेच शवविच्छेदन करण्यात आले. रात्री आठच्या सुमारास दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओंकार याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.













