दापोली तालुक्यात ११५१ नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

दापोली l प्रतिनिधी: शिक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाला विद्यार्थ्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी दिली.

 

उन्हाळी सुट्टीनंतर दापोली तालुक्यातील सर्व शाळा सोमवारी सुरू झाल्या. नवीन शैक्षणिक वर्षात दापोली तालुक्यातील सर्व शाळांमधून तब्बल ११५१ नवागत विद्यार्थी इयत्ता पहिलीत दाखल झाले आहेत. या नवागतांच्या स्वागतासाठी प्रत्येक शाळेत शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे यांनी दिली. पंचायत समिती शिक्षण विभागाकडून शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे नियोजन व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागताच्या कार्यक्रमाला पावसाने देखील तालुक्यात जोरदार हजेरी लावली.

 

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवागतांचे ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूकीने स्वागत करण्यात आले. शिवाय या नवागतांवर फुलांची उधळणही करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी माध्यमाच्या ९४९८ आणि उर्दु माध्यमाच्या १५६३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले. शिवाय इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या ६९०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेशांचेही वाटप करण्यात येणार होते. हा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती देखील गटशिक्षणाधिकारी यांनी दिली.