आ. किरण सामंत यांनी गांभीर्याने घेत काम दर्जेदार करण्याचे दिले आदेश
जैतापूर (वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामांदरम्यान पहिल्याच पावसात एक मोठी भिंत कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शिवप्रेमी वर्गात संतापाची लाट उसळली असून या कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. किल्ल्याची भिंत कोसळल्यानंतर शिवप्रेमींसह सर्वच राजकिय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पहाणी दौरा करत या कामाबाबत नाराजी व्यक्त करत काम दर्जेदार झाले पाहिजे अशी मागणी केली. दरम्यान सदरचे काम हे योग्य पध्दतीने व दर्जेदार केले जाईल अशी ग्वाहीही पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र या आता या किल्याच्या ढासळलेल्या भिंतीवरून राजकिय कुरघोडया आणि श्रेयासाठी लढाई सुरू झाली आहे.
मात्र अशा प्रकारे राजकिय कुरघोडया करून राजकारण करणाऱ्यापेक्षा या ऐतिहासिक वास्तुचे काम दर्जेदार कसे होईल यासाठी सगळयांनी प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेतुन व्यक्त होत आहेत.
मात्र या एकूणच प्रकरणी आमदार किरण सामंत यांनी गांभीर्याने दखल घेत या ऐतिहासिक वारसा असलेल्या नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या काम हे दर्जेदार आणि योग्य पध्दतीने झाले पाहिजे असे स्पष्ट निर्देश देत कामात काही गैर आढळल्यास कारवाईचा ईशारा दिला आहे.
या किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामांना काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली होती. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली हे काम सुरू असून, स्थानिक विकास निधी आणि विभागाच्या विशेष योजनांमधून निधी मिळवून हे काम हाती घेण्यात आले. मात्र पहिल्याच पावसात किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि स्थानिक ग्रामस्थांकडून यानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. “इतका निधी खर्च केला तरीही भिंत पावसात तग धरू शकत नाही, म्हणजेच कामात गडबड आहे असे नमुद करत या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा थेट आरोपही काहींनी केला आहे. केला जात आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वीचा वाद आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही जणांचा दावा आहे की, या किल्ल्याची विक्री करण्याचा डाव पूर्वी रचला गेला होता. काही जमीन दलालांनी यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या, तर संघटनेच्या नावाखाली पदाधिकारी आणि ग्रामस्थांना बाजूला ठेवत कंत्राटदाराची साटंलोट करून भ्रष्टाचाराला खतपाणी काही मंडळी घालत आहेत असे आरोपही केले जात आहेत. मात्र आता किल्ल्याची ढासळलेली भिंत हा विषय केवळ भौतिक नसून, श्रेयवादाची चढाओढ आणि स्थानिक राजकारणातील कुरघोडी करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाला आणखी रंग चढवणारी गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी एका माजी आमदारांसमोर झालेली तू-तू-मै-मै. या वादातून स्पष्ट होत आहे की, किल्ल्याच्या कामासंदर्भात केवळ तांत्रिक नव्हे, तर राजकीय आणि श्रेयवादाचं भांडवल उभं करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. किल्ल्याच्या पडझडीकडे कधीही न फिरकणारे लोक, आज ढासळलेल्या भिंतीच्या आडून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर श्रेयासाठी सुरू असलेली चढाओढ,वादविवाद, फोटो शेअर्स आणि प्रतिक्रियांमधून आता या किल्याच्या दुभंगलेल्या भिंतीच्या आडून राजकिय कुरघोडया होत असल्याचे दिसून येत आहे.
आमदार किरण सामंत यांनी घेतली गांभीर्याने दखल
या पार्श्वभूमीवर आमदार किरण उर्फ भैया शेठ सामंत यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष दिले आहे. त्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून शिवप्रेमी आणि ग्रामस्थांशी थेट संपर्कात राहून कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवले आहे. किल्ल्याचे काम हे उत्तम प्रतीचेच झाले पाहिजे. यात कसूर झाल्यास जबाबदारांवर कारवाई होईल. मात्र, कोणीही या ऐतिहासिक विषयावर राजकारण करू नये. ही आपली समृद्ध संस्कृती आणि इतिहास आहे, याचे जतन हे सर्वांनी मिळून करायचे असेही आ. सामंत यांनी नमुद केले आहे.
या कामाबाबत पुरातत्व विभागाकडून सध्या प्राथमिक चौकशी सुरू आहे. मात्र ही भिंत का कोसळली, यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, शिवप्रेमी मंडळं आणि स्वयंसेवी संस्था यांना या कामात सामावून घेताना योग्य प्रकारे काम पुर्ण झाले पाहिजे अशी मागणी स्थानिकांतुन व शिवप्रेमींतुन होत आहे.










