खेडमधील तहानलेल्या २२ वाड्यां साठी केवळ एकच टँकर

खेड(प्रतिनिधी)
तालुक्यात वाढत्या उष्माबरोबर पाणीटंचाईनेही कहर केला आहे. सद्यस्थितीत ६ गावे २२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, २२ वाड्यांची मदार एकाच शासकीय टँकरवर अवलंबून असल्याने प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करताना अक्षरश: तारेवरची कसरतच करावी लागत आहे. अपुऱ्या टँकरअभावी तहानलेल्या ग्रामस्थांनाही टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असून हे दिवसाआड मिळणाऱ्या पाण्यामुळे जेमतेम पाण्यावरच तहान शमवावी लागत आहे.
तालुक्यात पाणीटंचाईचा दाह वाढू लागल्याने प्रशासनापाठोपाठ ग्रामस्थ आतापासूनच मेटाकुटीस आले आहेत. सद्यस्थितीत ६ गावे व २२ वाड्यांना एका शासकीय टँकरद्वारे सुकिवली येथील चोरद नदीपात्रातून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शासकीय टँकरच्या ३४ फेऱ्या धावत असल्या तरी अपुऱ्या टँकरमुळे टंचाईग्रस्त गाव – वाड्यांतील ग्रामस्थांना टँकरची प्रतीक्षाच करावी लागत आहे. प्रसंगी रणरणत्या उन्हातून मैलोन्मैल भटकंती करून मिळणाऱ्या जेमतेम पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.
यंदा टंचाई आराखड्यात २३ गावे ५५ वाड्यांचा समावेश करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई लांबणीवरच पडल्याने प्रशासनासह ग्रामस्थांना दिलासा मिळाला होता. तालुक्यात ८ एप्रिलपासून पाण्याचा टँकर धावत आहे. उन्हाच्या काहिलीत तहानलेल्या गाव वाड्यांची संख्याही वाढत असतानाही प्रशासनाकडे अवघा एकच टँकर उपलब्ध असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.