राजापुरात बंगलवाडी येथे भंगार विक्रेत्याचे पत्रे चोरण्याचा प्रयत्न

दोघांविरोधात गुन्हा दाखल

राजापूर l प्रतिनिधी : शहरातील एसटीडेपोसमोरील बंगलवाडी येथे भंगार दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली आहे. मल्लिकअर्जुन हुसेनी वाघमारे (वय ४८, रा. राजापूर बंगलवाडी) यांच्या भंगार दुकानाचे पत्रे काढून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी अनंत दत्ताराम मासये आणि अमर नारायण चिपटे (दोघेही रा. राजापूर बंगलवाडी) यांनी मल्लिक अर्जुन हुसेनी वाघमारे यांच्या बंगलवाडी येथील भंगार दुकानाचे पत्रे काढण्याचा प्रयत्न केला. चोरीचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला, तरी या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी फिर्यादी मल्लिकअर्जुन हुसेनी वाघमारे यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून राजापूर पोलीसांनी या दोन चोरटयांविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२), ६२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.