श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

३०० कोटी ठेवींचे लक्ष्य- प्रभाकर आरेकर

चिपळूण (प्रतिनिधी) : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेची २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांचे अध्यक्षतेखाली ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूणच्या कै. बाबासाहेब बेडेकर सभागृहात उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या आर्थिक वर्ष सन २०२३/२४ मध्ये संस्थेने केलेल्या कामकाजाचा अहवाल सभासदांना सादर करण्यात आला.

 

संस्थेने केलेल्या प्रगतीची माहिती व भविष्यातील संकल्प याबाबत बोलताना संस्थेने २०२५/२६ या आर्थिक वर्षासाठी तीनशे कोटी ठेवीचे लक्ष्य ठेवल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर सांगीतले. तसेच सन २०२४/२५ या आर्थिक वर्षात भाग भांडवालामध्ये ३ कोटी ३ लाख वाढ होऊन संस्थेचे भागभांडवल १२ कोटी ८४ लाख झाले आहे. संस्थेच्या एकूण ठेवी रुपये २१९ कोटी ०४ लाख असुन एकूण कर्ज व्यवहार रुपये १७६ कोटी १८ लाख आहे. संस्थेचा एकूण निधी रुपये १८ कोटी ०६ लाख असुन एकूण गुंतवणूका रुपये ८३ कोटी ९४ लाख आहेत. संस्थेचा एकूण व्यवसाय रुपये ३९५ कोटी २२ लाख असून खेळते भांडवल रुपये २७३ कोटी ८२ लाख इतके आहे. संस्थेला सन २०२४/२५ या आर्थिक वर्षात रुपये १६ कोटी ५० लाख एकूण नफा झाला असुन नियमानुसार सर्व तरतुदी केल्यानंतर रुपये ६ कोटी ८६ लाख निव्वळ नफा झालेला आहे. तसेच संस्थेला २०२४/२५ साठी ऑडीट वर्ग अ प्राप्त झाला असल्याची माहिती यावेळी दिली. संस्थेच्या सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

 

वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित सभासदांनी कामकाजात सहभाग घेवून संस्थेचे सभासद नंदकुमार तांबे, सिताराम शिंदे, रमेश जाधव, किशोर शेट्ये, दत्ताराम सुर्वे, दिपक कदम व विलास नामजोशी यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करून संस्थेने अतिशय योजनाबध्द काम केले असून संस्थेची विश्वासार्हता सतत वाढत असल्याचे नमूद केले.

 

यावेळी संस्थेच्या सभासदांच्या १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या विशेष पुरस्कार प्राप्त सभासदांचा संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला.

 

यावेळी पीएचडी गाईड म्हणून कार्यरत असलेले डॉ. राहुल निश्वनाथ दंडगे, ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे आरोग्य रत्न धन्वंतरी पुरस्कार प्राप्त डॉ. राजीव विश्वनाथ दंडगे, राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२५, राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार, सर्व स्तरावर विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या दलवाई हायस्कुलच्या शिक्षिका सौ. रागिणी पराग आरेकर, युपीएससी परीक्षेत नेत्रदिपक यश प्राप्त केलेल्या कु. सिध्दार्थ पारसमल जैन यांचा संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला.

 

त्याचप्रमाणे आर्थिक वर्षात व्यवहार वाढीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणारे कर्मचारी राकेश अशोक गोयथळे, संदीप विष्णू राउत, सौ. दुर्वा सिध्देश सुर्वे व अजिंक्य उदय तवसाळकर या कर्मचाऱ्यांचा आदर्श कर्मचारी २०२५ म्हणून सत्कार करण्यात आला.

 

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर संचालक दिलीप मयेकर, अरुण पाटील, सुहास भोसले, विजय जाधव, पराग आरेकर, दिलीप वानरकर, उदय वेल्हाळ, संचालिका सौ. स्मिता आरेकर, श्रीम. प्रज्ञा नरवणकर, पल्लवी भाटकर, सभासद सर्वश्री दत्ताराम सुर्वे, रमेश जाधव, दिपक कदम, किशोर शेट्ये, मनोहर शेट्ये, सिताराम शिंदे, नंदकुमार तांबे, गंगाधर गोंजारे, संतोष सुर्वे तसेच अनेक सभासद व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव संदिप रहाटे यांनी केले.