सावंतवाडी नं. ४ शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत ‘सिल्व्हर’ कॅटेगिरीत घवघवीत कामगिरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ आयोजित इ. ५ वी साठीची राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षा एप्रिल २०२५ मध्ये पार पडली. या परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं. ४ मधील तीन विद्यार्थ्यांनी ‘सिल्व्हर कॅटेगिरी’ मध्ये घवघवीत यश संपादन करून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

या कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत कु. पार्थ अशोक बोलके, कु. हार्दिक अनिल वरक आणि कु. वीरा राजीव घाडी यांनी अत्युत्तम कामगिरी करत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेचे व परिसराचे कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची चिकाटी, सातत्याने घेतलेली अभ्यासाची मेहनत, तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. महेश पालव सर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्तम तयारी करून हे यश प्राप्त केले आहे.

या तिन्ही विद्यार्थ्यांचे, त्यांच्या शिक्षकांचे व पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून शाळेने मिळवलेली ही यशोगाथा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.