रेशन दुकानदारांना थकित कमिशन देणार*

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे ऑनलाईन बैठकीत दुकानदार संघटनेला आश्वासन

चिपळूण (प्रतिनिधी):– रेशन दुकानदारांचे थकित कमिशन येत्या ८ दिवसात दिले जाईल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत दिले. आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. अन्य मागण्यांसाठी लवकरच प्रत्यक्ष बैठक होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिली.

 

कदम म्हणाले, गावागावात अनेक समस्यांचा सामना करीत रेशन दुकानदार शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत, असे असताना याच दुकानदारांना त्यांचे कष्टाचे कमिशनं वेळेत मिळत नाही. त्यामुळे अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ येत आहे. हा प्रकार संघटनेच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांच्यासह लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यात आला होता. त्यानुसार मंत्री भुजबळ यांच्यासमवेत ऑनलाईन बैठक झाली.

 

चर्चेअंती येत्या आठ दिवसात थकित कमिशन चालू महिन्यापर्यंत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच दुकानदारांना २०१४ सालापासून लागू करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा कायद्यापासून महागाईप्रमाणे कमिशन वाढ करावी, २०१३ ते २०१८ या कालावधीतील धान्य वाहतुकीच्या फरकाची रक्कम मिळावी, धान्य वितरणाव्यतिरिक्त कराव्या लागणाऱ्या आधार सिडींग, मोबाईल फिडींग, ईकेवायसी, ई-श्रमयादीची माहिती देणे, दिव्यांग लाभार्थी शोधणे या कामांचा मोबदला द्यावा, धान्य विक्रीचे कमिशन विक्री होताच लगेच मिळावे, राज्यातील सर्व्हर व नेटवर्कमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यात यावी अशा मुद्यांवर चर्चा झाली. त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन भुजबळ यांनी दिल्याचे कदम यांनी सांगितले.

 

या बैठकीत आमदार शेखर निकम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, खजिनदार रमेश राणे आदी सहभागी झाले होते.