आयुष्यात तत्वांशी प्रामाणिक राहत वडिलांचा वारसा जपला : विकासभाई सावंत

६२ व्या वाढदिवसानिमित्त विकासभाईवर शुभेच्छांचा वर्षाव

सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘चांगलं काम करत राहा’ हा वसा घेऊन आयुष्यभर वाटचाल करत राहिलो. तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. वडिलांच्या निधनानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी मला विधान परिषदेची ऑफर दिली, पण नियमांना झुगारून मी ती स्वीकारली नाही. वडिलांच्या पक्षाशी मी प्रामाणिक राहत त्यांचा वारसा जपला, अशा भावना सावंतवाडी येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकासभाई सावंत यांनी व्यक्त केल्या. ६२ व्या वाढदिवसानिमित्त राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांच्या शुभेच्छांना उत्तर देताना ते बोलत होते.
विकासभाई सावंत यांचा वाढदिवस शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. यावेळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. याप्रसंगी बोलताना विकासभाईंनी आपल्या आयुष्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “खरं तर, मला वाढदिवस साजरे करायला विशेष आवडत नाहीत. आयुष्यात मला लाभलेली माणसं आणि त्यांचे अनुभव, यातूनच मी स्वतःला घडवत गेलो. कितीही कौतुक झालं तरी, माझ्यावर झालेले संस्कार हे माझ्या अनेक गुरूंनी रुजवले आहेत. मी कधीही शॉर्टकटचा वापर केला नाही. ज्या व्यक्तींनी तत्वनिष्ठ जीवन जगले, त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. म्हणूनच, मी देखील जीवनात तत्वाशी कधीही तडजोड केली नाही.”

वडिलांच्या निधनानंतर मिळालेल्या संधींबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले, “वडिलांच्या निधनानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी मला विधान परिषदेची ऑफर दिली होती, पण मी त्यावेळी तीस वर्षांचा नसल्याने, नियमांना झुगारून मी ती स्वीकारली नाही. त्यानंतरही अनेक संधी आल्या, पण मी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. ज्या पक्षाने माझ्या वडिलांना नावलौकिक मिळवून दिला, त्या पक्षाशी मी अत्यंत प्रामाणिक राहिलो आहे आणि आजन्म राहीन.”
शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीबद्दल ते म्हणाले, “अभ्यास करूनच, मी माझ्या वडिलांच्या सहकाऱ्यांच्या इच्छेखातर शैक्षणिक क्षेत्रात उतरलो. या वाटचालीत मला अनेक जणांची साथ मिळाली. सर्वांनी मला मान-सन्मान दिला, सोबत केली आणि साथ दिली. त्या सर्वांचा मी आभारी आहे. माझ्या सर्व संस्थांच्या वाटचालीत माझ्या सर्व सहकाऱ्यांची मेहनत आहे; मी केवळ निमित्तमात्र आहे.”
आपल्या जीवनातील मूल्यांवर भर देताना त्यांनी सांगितले, “मला आयुष्यात सर्व काही आयतं मिळालं, पण ते टिकवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. आयुष्यात अनेक थोरामोठ्यांच्या सोबत राहता आलं हे माझं भाग्य. मी आज जे काही आहे, ते त्या सर्वांमुळेच. त्यामुळे, माझ्याकडून आयुष्यात जे काही सर्वाधिक चांगलं देता येईल, ते देण्याचा माझा प्रयत्न आहे. आयुष्यात चुकीच्या कामासाठी कोणाचे पाच रुपये घ्यायचे नाहीत आणि कोणाला कधी द्यायचे नाहीत, हे तत्व मी काटेकोरपणे पाळले आहे. आयुष्यात कोणतेही व्यसन केले नसतानाही आजारांनी साथ दिली, पण मी डगमगलो नाही.”
वडिलांच्या शिकवणीचा उल्लेख करत ते भावूक झाले, “लहानपणी शेतात गेल्यावर वडिलांच्या पायांच्या ठशांवर पाय ठेवून चालायचो. आयुष्यात तेच जपलं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी काम केले. राज्य शिखर बँकेचा उपाध्यक्ष म्हणून मी बिनविरोध निवडून गेलो. जिल्हा बँकेत अनेक वर्षे संचालक राहिलो, पण कधीही काही चुकीचे वागलो नाही. कै. भाईसाहेब सावंत गंमतीने म्हणायचे की, ‘जीना यहा, मरना यहाँ, माजगावशिवाय जाणा वहा’. तसेच, मंत्रीपद हे अळवावरचं पाणी आहे, ते कायम टिकत नाही, त्यामुळे ते डोक्यात जाऊ द्यायचं नाही. तेच तत्व मी आयुष्यभर पाळले आहे.”
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते ॲड. दिलीप नार्वेकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक गुरुनाथ नाईक, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही.बी. नाईक, उपाध्यक्ष दिनेश नागवेकर, सदस्य अमोल सावंत, वसुधा मुळीक, ॲड. श्यामराव सावंत, ना. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक तथा विकास भाईंचे सुपुत्र विक्रांत सावंत, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, बाब्या म्हापसेकर, आरपीडीच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.