व्यापारी संकुलामधील दुकानगाळे अनेक वर्षे बंद

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली पाहाणी : आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधणार

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलामध्ये अनेक दुकानगाळे अनेक वर्षे बंद स्थितीत आहेत. यामुळे पालिकेबरोबरच शासनाचेही कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे, याची माहिती शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना दिल्या नंतर सामंत यांनी तातडीने शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह परिसरातील बंद दुकान गाळ्यांची पाहणी केली. दरम्यान, याबाबत आमदार नीलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात येणार असून काही शिथिलता होत असेल तर ती देऊन पालिकेचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने शहरातील सुशीक्षीत बेरोजगारांना सदरचे दुकानगाळे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले

यावेळी शहर प्रमुख दीपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, अरूण तोडणकर, सीताराम फाटक, शानू वालावलकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दुकान गाळ्यांच्या ठिकाणी बोलवून त्यांच्याशीही दत्ता सामंत यांनी चर्चा केली.

नगरपालिकेच्यावतीने पंधरा वर्षांपुर्वी बांधण्यात आलेले अनेक दुकानगाळे आजही बंदस्थितीत आहेत. सध्या यासाठी आठ हजार रूपये भाडे आणि सुमारे ६ लाख रूपये डिपॉझीट निश्चीत करण्यात आलेले असल्याने सर्वसामान्यांना सदरची रक्कम परवडणारी नाही. अनेक गाळे हे आतील बाजूला असल्याने डिपॉझीट आणि भाड्यामध्ये सुट मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक होता. मालवणात असंख्य तरूण व्यवसाय करण्यासाठी इच्छूक आहेत, मात्र अवाजवी भाड्यांमुळे कोणीही याठिकाणी येत नाहीत. यामुळे मच्छीमार्केट, नाट्यगृह याचबरोबर इतरही ठिकाणी पालिकेचे दुकानगाळे बंदस्थितीत आहेत. आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून आपण प्रयत्नाशील असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले.