सावंतवाडी राजवाडा येथे उद्या ‘योग दिन’ होणार साजरा –

सहभागी होण्याचे ‘भारतीय जनता पार्टी ‘ तर्फे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिनाचा मुद्दा मांडल्यानंतर जागतिक योग दिन साजरा करायचा अशी मान्यता संयुक्त राष्ट्र परिषदेने दिली आणि त्यानंतर २१ जून २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरुवात करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या सर्व संघटना तसेच सर्व योग विद्या प्रेमी एकत्र येऊन शनिवारी सकाळी साडेसहा वाजता राजवाडा येथे योग दिन साजरा करणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले यांनी केले. सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, युवा नेते संदीप गावडे, शहर मंडला अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, ॲड. चैतन्य सावंत, अनिकेत आसोलकर, दया गावडे आदी उपस्थित होते. युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व जगाला पटवून दिले आहे. योग हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रोगराई, विकार, आजारपणाला दूर करण्यासाठी योगाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, यावेळी संदीप गावडे म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली. २१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिवस’ जगभर साजरा करण्यात आला. उद्या १० वा योगदिन होत असून सकाळी ६ वा. हा कार्यक्रम सावंतवाडी राजवाडा येथे संपन्न होणार आहे यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. गावडे यांनी केले. –