गोव्याच्या आरोपीला रत्नागिरी पोलिसांनी पकडले
रत्नागिरी | प्रतिनिधी
संचित रजा उपभोगून तब्बल 9 महिने फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबईतून आवळल्या.
चन्नाप्पा सनन्नाप्पा गंगवार (33,रा.कस्टोडिया दियास,लयामती दावोलिंम सालसेट,गोवा,मुळ रा. कुमाटगी विजापूर, कर्नाटक) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मरगाव शहर पोलिस ठाणे येथे भादंविसं चे कलम 302, 364, 201 अन्वये कोलवाड ता. बारदेस, गोवा येथील मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. दरम्यान, त्याला गोव्याचे अपर पोलिस महासंचालक यांनी 11 जुलै 2024 ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत 30 दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती. या रजेच्या कालावधीत तो रत्नागिरीमध्ये रहिवास करणार होता. तसेच पॅरोल रजा भोगून तो 9 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वा. पुन्हा गोवा येथील मध्यवर्ती कारागृहात स्वतः हजर होणे आवश्यक होते.
परंतू, आरोपी चन्नापा गंगवार आपली संचित रजा उपभोगून कारागृहात न परतल्यामुळे रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात भारती न्याय संहिता 2023 चे कलम 262 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला आरोपी हा नवी मुंबई या ठिकाणी वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. याआधारे या पथकाने गुरुवार 20 जून रोजी त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेउन पुढील आवश्यक कार्यवाहिसाठी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात हजर केले. ही कामगिरी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे,अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायगवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस हवालदार विजय आंबेकर,दिपराज पाटील,विवेक रसाळ व चालक पोलिस काँस्टेबल अतुल कांबळे यांनी केली.












