रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील उद्यमनगर येथे किरकोळ काणातून एकाला लाथाबुकक्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवार 17 जुलै रोजी दुपारी 3.30 वा.सुमारास घडली.
याप्रकरणी फहद मुस्ताक पाटणकर (रा.शिवाजीनगर,रत्नागिरी) आणि अयान मुल्ला अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात साहिल समिर सोलकर (26,रा.शेट्येनगर,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी दुपारी फिर्यादी साहिल सोलकर हा त्याच्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-बीसी-0150) घेउन ओसवालनगर ते उद्यमनगर असा जात होता. तो खलपे हाउस समोर आला असता संशयित दोघांनी आपल्या अॅक्सेस दुचाकीवरुन त्याला कट मारला. तसेच फिर्यादीला गाडीवरुनच शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देत फहद पाटणकरने फिर्यादीला ‘तू चंपक मैदानावर ये मग तुला बघतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर संशयितांनी उद्यमनगर येथील कबाब कॉर्नर येथे फिर्यादीच्या रिक्षाला पुन्हा ओव्हरटे करुन त्याच्या रिक्षे समोर आपली दुचाकी आडवी लावली. तेव्हा फिर्यादीने रिक्षा थांबवून फहद पाटणकरला काय फालतूगिरी आहे असे विचारले. याचा राग आल्याने फहदने फिर्यादीला पाठीमागून पकडून ठेवले व संशयित अयान मुल्लाने लाथाबुकक्यांनी तर फहदने त्याला लोखंडी रॉडने मारहाण करत दुखापत केली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.












