अधिकाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थ व शिवप्रेमीही उपस्थित रहाणार
राजापूर (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या तालुक्यातील नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामांदरम्यान पहिल्याच पावसात एक मोठी भिंत कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या एकूणच प्रकरणी तात्काळ दखल घेत आ. किरण सामंत यांनी ऐतिहासिक वारसा असलेल्या नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या काम हे दर्जेदार आणि योग्य पध्दतीने होईल अशी ग्वाही दिली होती. रविवारी दुपारी १२ वाजता आ. किरण सामंत हे प्रत्यक्ष नाटे येथे घेरा यशवंत गडाची कोसळेली भिंत व संपुर्ण गडासह सुरू असलेल्या कामाची पहाणी करणार आहेत.
नाटे येथील पुरातन व ऐतिहासिक वारसा असलेल्या घेरा यशवंत गडाच्या डागजुगी व दुरूस्तीचे काम शासनाच्या पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. मात्र हे काम सुरू असतानाच यावर्षीच्या पहिल्याच पावसात या किल्ल्याची संरक्षण भिंतच ढासळली. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले व शिवप्रेमींसह स्थानिकांतुन याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर अनेकांनी या किल्ल्याला भेट देत या कामाची पहाणी करत याबाबत प्रशासनाला निवेदन दिले.
या किल्ल्याची भिंत कोसळल्याचे कळताच आ. किरण सामंत यांनी याची तात्काळ दखल घेत संबधित विभागाच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधून माहिती घेतली. राजापूर तालुक्यातील हा एक ऐतिहासिक ठेवा व वारसा आहे, त्यामुळे या कामात कोणताही हलगर्जीपणा आपण खपवून घेणार नाही असा स्पष्ट ईशारा आ. सामंत यांनी दिला होता. तर या किल्ल्याचे काम हे दर्जेदार होईल अशीही ग्वाही जनतेला दिली होती. यामध्ये कुणीही राजकारण करू नये असेही आ. सामंत यांनी नमुद केले होते.
रविवारी २२ जून रोजी आ. किरण सामंत हे पुरातत्व विभागाचे अधिकारी, शिवप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ यांच्यासोबत प्रत्यक्षात या किल्ल्याची, कोसळलेल्या भिंतीची व अन्य सुरू असलेल्या कामांची पहाणी करणार आहेत.










