लांजा साटवली मार्गावरील आकेशियाची झाडे ठरताहेत धोकादायक

पाऊस आणि वादळात अनेक झाडे केव्हाही खाली मोडून पडण्याची भीती

लांजा( प्रतिनिधी) लांजा साटवली मार्गावर भटवाडी शाळेपासून ते कोत्रेवाडी पर्यंत रस्त्यालगत असलेले आकेशियाची अनेक झाडे ही धोकादायक स्थितीत असून ती पावसाळ्यात केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्याचे दृष्टीने सदर झाडे तातडीने तोडण्याची मागणी कोत्रेवाडीतील नागरिक आणि पालक वर्गातून केली जात आहे.

लांजा साटवली हा कायम वर्दळीचा रस्ता आहे या रस्त्यावरून लांजा भटवाडी शाळा ते कोत्रेवाडी दरम्यान रस्त्यालगत आकेशियाची अनेक झाडे धोकादायक स्थितीत उभी आहेत. रस्त्यालगत असलेली झाडे वाकलेल्या स्थितीत असून वादळ, पाऊस आणि वादळी वाऱ्यामध्ये ही झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. लांजा कोत्रेवाडी, पालेवाडी येथील ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थी , वाहन चालक यांची नेहमीची रस्त्यावरून ये-जा असते. अशा स्थितीत ही झाडे कोसळल्यास जीवितहानी होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे ही धोकादायक झाडे तातडीने तोडण्याची आवश्यकता आहे.

आणि म्हणूनच संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने ही धोकादायक झाडे बांधकाम विभागाने तातडीने तोडावीत, अशी मागणी कोत्रेवाडी येथील नागरिक, पालक वर्ग यांनी केली आहे.