१ लाख ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नेले चोरून

लांजा माऊली नगर येथील घटना

लांजा (प्रतिनिधी) फ्लॅटच्या बेडरूम मधील कपाटात ठेवलेले १ लाख ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना लांजा माऊली नगर येथे घडली आहे. दिनांक १५ ते २१ जून या कालावधीत घडलेल्या या घटने प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौ रुही सुयोग तांबे (वय ३७) यांनी याबाबतची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात केली आहे .त्या सध्या लांजा देवघे येथील सेंट ॲनी विद्यानिकेतन या प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यां लांजा शहरातील माऊली नगर येथे साई समर्थ या बिल्डिंगमध्ये फ्लॅटमध्ये राहतात. त्यांनी आपले ३१ ग्रॅम वजनाचे आणि १ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच ४० हजार रुपये किमतीचा १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार असे एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने त्या राहत असलेल्या फ्लॅटच्या बेडरूम मधील एका कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले होते. दिनांक १५ जून रोजी सकाळी ८ ते २१ जून रोजी सकाळी ७.४५ या कालावधीत अज्ञात चोरट्याने हे दागिने लंपास केले आहेत.

याप्रकरणी त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले हे करीत आहेत.