सावर्डे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा पंढरपूर येथे स्नेहमेळावा

 २१४ माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती; आ. शेखर निकम यांच्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

 शेतीपूरक व्यवसायात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यास स्थानिकांना प्रवेश करावे- आ. शेखर निकम

चिपळूण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती व्यवसाय करावा, एआय तंत्रज्ञानासह शेतीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करुन शेती पुरक व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप द्यावे व सामाजिक बांधिलकी जपून सर्वसामान्य शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रेरित करावे, असे प्रतिपादन आ. शेखर निकम यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध आठवणींना उजाळा दिला व महाविद्यालयाच्या स्थापनेपासुन आजतागायत झालेल्या शैक्षणिक प्रवासाचा त्यांनी आढावा घेतला.
शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील २००१ ते २०२४ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा पंढरपूर येथे स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आ. शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील हे प्रमुख अतिथी लाभले. शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालया मार्फत स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्रि ॲग्री ॲल्युमनी असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांना संघटीत करणे, आजी व माजी विद्यार्थ्यांसोबत ऋणानुबंध कायम ठेवणे व त्यांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणे हा प्रमुख उद्देश ठेवुन पंढरपुरमध्ये प्रथमच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास सर्व माजी विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच विद्यार्थ्यांच्या सोबत आपुलकीने संवाद साधला. प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. सुमारे २५ वर्षाच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार होते आले तसेच त्यांच्या सुख दुखात सहभागी होता आले व त्यांचे उज्ज्वल यश ही बघता आले ही भाग्याची गोष्ट आहे, असे प्रतिपादन केले.
अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार आमदार शेखर निकम व डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात सहभागी झालेले विद्यार्थ्यी महाविद्यालयातील आठवणींनी भारावून गेले. पंढरपूर तथा विठुरायाच्या पावनगरीत हा स्नेहमेळावा अगदी पालखीच्या पूर्वार्धात होण्याचा योगायोग नक्कीच पावित्र्यपूर्णता दर्शवत आहे. कोणताच कुठलाच संबंध नसताना कॉलेजच्या माध्यमातून आपना सर्वांना आयुष्यभरासाठी एकत्रित बांधणारा धागा आ. शेखर सर आणि ज्यांनी हा धागा हृदयापासून जपला व वेळोवेळी अधिक घट्ट केला असे प्राचार्य डॉ. पाटील सर यांच्याबद्दल सर्व माजी विध्यार्थ्यानी ऋण व्यक्त केले व कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे मार्गदर्शनानुसार डॉ. हरिश्चंद्र भागडे, प्रा.प्रसाद साळुंके, विपुल घाग, प्रा.प्रणय ढेरे व प्रा.रविंद्र सरगर यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो फाईल- सीपीएन२२-१२
आ. शेखर निकम यांचा सन्मान करताना माजी विद्यार्थी.