आ. शेखर निकम यांच्या पुढाकाराने सभागृहासाठी २५ लाखांचा निधी मंजूर!
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहर हे सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध केंद्र म्हणून ओळखले जाते. अशा या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून श्री नामदेव शिंपी समाजाची मागणी होती की, समाजासाठी स्वतंत्र सभागृह असावे, एक अशी वास्तू जी समाजाच्या एकात्मतेचं, सांस्कृतिक उन्नतीचं प्रतीक ठरेल. ही मागणी निवडणुकीच्या काळात आमदार शेखर निकम यांच्या कानावर गेली आणि त्यांनी सभागृह उभारणीचा शब्द दिला होता. आता त्यांनी तो शब्द पाळत, नगर विकास विभागाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था योजनेंतर्गत २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल श्री नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ, चिपळूण तर्फे आमदार शेखर निकम यांचे जनसंपर्क कार्यालयात जाऊन जाहिर आभार मानण्यात आले.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विवेक रेळेकर, सेक्रेटरी संतोष होमकर, प्रसाद आवळे, अंकुश आवळे, प्रफुल्ल रेळकर, चेतना होमकर, विद्या रेळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिंपी समाजासाठी हे सभागृह केवळ एक इमारत नसून सामाजिक संवाद, संस्कृती संवर्धन आणि पुढील पिढ्यांना एक ओळख मिळवून देणारे केंद्र ठरणार आहे, अशी भावना यावेळी मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.













