चिपळूण (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योगभ्यासाला जागतिक चळवळ आणि जागतिक भावना बनविण्याच्या उद्देशाने २०१४ पासून २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वच स्तरातून या दिवशी नागरिक एकत्र येऊन योगसाधना करतात. डेरवण येथील क्रीडा संकुलातही २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात व शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या एशियन योगा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या तन्वी भूषण रेडीज, बी.के.एल वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मानसिंग घाडगे, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर एल, इंग्लिश मिडियम स्कूलच्या संचालिका सौ. शरयू यशवंतराव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, समर्थ नर्सिंगच्या मुख्याध्यापिका तेजल सुर्वे, अमर बारावडे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांकडून सकाळच्या सत्रात, योग दिनाच्या माध्यामातून प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ध्यान व ताडासन, वृक्षासन, वीरभद्रासन, त्रिकोणासन, शलभासन, भुजंगासन, विपरीत शलभासन, सर्वांगासन, धनुर्रासन, पर्वतासन, आदी योगासनांची प्रात्याक्षिके करवून घेतली गेली. तसेच एसव्हीजेसीटी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यानी सादर केलेले योग व मल्लखांबची प्रात्यक्षिके विशेष आकर्षण ठरली. “योग हे फक्त व्यायाम नसून संपूर्ण जीवनशैली आहे. मानसिक स्थैर्य, शारीरिक आरोग्य आणि आत्मिक शांतता मिळवण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे.” असे तन्वी रेडीज यांनी योगशास्त्राचा संदर्भ देत सांगितले. योगाभ्यासाद्वारे आपण नि:स्वार्थ कृती जाणून घेतो कर्म ते कर्मयोगाचा प्रवास आपण ठरवितो आणि आपल्या आरोग्यात अधिक सुधारणा करू शकतो, असाही विश्वास त्यांनी योगाभ्यासाचे महत्व सांगताना व्यक्त केला. दुपारच्या सत्रात आयोजित कार्यक्रमात क्रीडा संकुलात विविध खेळांचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना मार्गदर्शक श्रीमती प्रतीक्षा पेंढारी यांनी पतंजली ऋषींनी सांगितलेल्या अष्टांग योग, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा याविषयी सखोल माहिती दिली. तर प्रशिक्षक विनायक पवार यांनी आसन प्रकारांमध्ये बसून उभे पाठीवर पोटावर झोपून केली जाणारी आसने यांची प्रात्यक्षिके करून घेतली. याचबरोबर प्राणायाम मध्ये अनुलोम विलोम भ्रामरी, शीतली, शीतकारी, तर हास्य योगाच्या अर्जुन हास्य, मर्कट हास्य, वारकरी हास्य प्रकारांची शास्त्रशुद्ध माहिती व प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
फोटो फाईल- सीपीएन२२-१३
डेरवण येथील इनडोअर स्टेडियममध्ये योग दिनानिमित्त योगासने करताना विद्यार्थी










