मळगावच्या प्रसन्न सोनुर्लेकरला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सुवर्णपदक!

तृतीय वर्ष पदवी परीक्षेत इतिहास विषयातून विद्यापीठात प्रथम क्रमांक

नाशिक येथे होणार सत्कार : वेणूताई चव्हाण पारितोषिकाने गौरवणार

सावंतवाडी । प्रतिनिधी : येथील सुपुत्र प्रसन्न प्रदीप सोनुर्लेकर याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जून २०२४ मध्ये झालेल्या तृतीय वर्ष पदवी परीक्षेत इतिहास विषयातून विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाचा मान मिळवला आहे. प्रसन्न हा सावंतवाडी येथील आरपीडी ज्युनियर कॉलेज कॅम्पसमधील डॉ. जे.बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अभ्यासकेंद्राचा विद्यार्थी आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे मळगाव आणि सावंतवाडी परिसरात आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण पसरले आहे.

येत्या ३० जून रोजी नाशिक येथे विद्यापीठाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात प्रसन्न सोनुर्लेकरला महाराष्ट्र शासन पुरस्कृत वेणूताई चव्हाण पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. हे पारितोषिक त्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीची साक्ष आहे. प्रसन्नच्या या यशामुळे डॉ. जे.बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे नावही उज्वल झाले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही.बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, संस्थेचे पदाधिकारी, केंद्र संचालक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच मार्गदर्शक प्राध्यापक यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. प्रसन्नच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली असून, तो भावी पिढीसाठी एक आदर्श ठरला आहे.